Home शहरे अकोला विधानसभा लक्षवेधी – महासंवाद

विधानसभा लक्षवेधी – महासंवाद

0
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक  उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई दि. 8 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी करार व कंत्राटी पद्धतीवर आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून अधिवेशन काळात याबाबत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून कायम करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात पाच वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे शक्य नसल्याने सध्या कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मानधन वाढीबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर निवडणुकीनंतर सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत

 

मुंबई, दि. 8 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या लगतच्या 42 गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव यांनी मांडली होती.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात आणि हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही असा नियम असल्याने याबाबत निवडणूक झाल्यानंतर या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/