Home बातम्या राजकारण विधानसभेला तिकीट मिळणार की नाही, याचीही खडसेंना धास्ती ?

विधानसभेला तिकीट मिळणार की नाही, याचीही खडसेंना धास्ती ?

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अनेक दिवसांपासून सत्तेपासून बेदखल आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसेंनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर खडसे यांचा मंत्रीपदासाठी पुन्हा विचार झाला नाही. आता खडसे यांनीही आस सोडून दिली की काय, असा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे.

खडसे म्हणाले की, तिकीट मिळणार की नाही, हेही आपल्याला ठावूक नाही. तसेच जनता आपल्या पाठिशी असल्याचे नमूद केले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खडसेंना सपशेल डावण्यात येते की, काय अशी चर्चा जळगावमध्ये सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात खडसेंना स्थान मिळणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, भाजपने बाहेरून आलेल्यांना मंत्रीपद दिले. त्यामुळे खडसेंना पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा होती. दरम्यान आता तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. परंतु, या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळणार की नाही, इथपर्यंत खडसेंना धास्ती असल्याचे दिसून येते. पक्ष तिकीट देओ न देओ जनता आपल्या पाठिशी असल्याचं खडसेंनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. यामुळे खडसेंना विधासनसभा निवडणुकीत भाजपकडून धक्का मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील संघर्षात महाजनांचीच सरशी

जळगाव जिल्ह्यातील खडसे-महाजन यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे जिल्ह्यात वाढलेले वजन आणि खडसे यांची झालेली पिछेहाट जळगावमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यातच मंत्रीमंडळ विस्तारातही खडसेंना स्थान मिळाले नसल्यामुळे राज्यातील भाजप नेतृत्व महाजनांच्याच बाजूने असल्याचे दिसून येते.