Home बातम्या ऐतिहासिक विधान परिषद प्रश्नोत्तरे

विधान परिषद प्रश्नोत्तरे

0
विधान परिषद प्रश्नोत्तरे

पदोन्नती व पदस्थापनेचा बोगस आदेश निर्गमित करणारे अटकेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 21 : अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देऊन त्यांना अन्य पदावर पदस्थापना देण्याबाबतचा बोगस आदेश दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी व्हॉट्सॲपद्वारे निर्गमित झाला होता. बोगस आदेश निर्गमित झाल्याचे कळताच 7 जानेवारी 2022 रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. त्यात संदेश चव्हाण आणि त्याचा साथीदार उमेश यांना अटक करण्यात आली असून हे दोघेही कारागृहात असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, विजय उर्फ भाई गिरकर यांनी उपस्थित केला होता.

000

कृषी उद्योगातील गैरव्यवहार टाळण्यासाठी टॅली सॉफ्टवेअरद्वारे ऑडिट – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, अहमदनगर या कार्यालयाकडून 2012 ते 2017 या कालावधीत 1 कोटी 20 लाख 98 हजार रूपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले असून यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आर्थिक गुन्हे अन्वेषण, अहमदनगर यांच्यामार्फत एफ.आय.आर. दाखल करण्यात आला असून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणी काही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात येणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी उद्भवू नये, यासाठी सर्व महाराष्ट्रात टॅली या आज्ञावलीद्वारे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या 21 अधिकारी-कर्मचारी यांना विभागामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून दोषी सेवानिवृत्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. वितरक व लाभार्थी ग्राहकांकडून येणाऱ्या रकमेच्या अफरातफरीप्रकरणी कोणत्याही निरपराध कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. या अपहार प्रकरणी 15 दिवसांच्या आत कृषी आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे श्री.भुसे यांनी सांगितले.

या रक्कम अपहारात 15 लाख  30 हजार रूपये एका लिपिकांकडून वसूल करण्यात आले आहे. दोन कर्मचारी हे न्यायालयात गेले असून याबाबतची वस्तुस्थिती न्यायालयात भक्कमपणे मांडण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात विधान परिषद सदस्य सर्वश्री अमोल मिटकरी, चंद्रशेखर बावनकुळे, अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

000

दूध उत्पादकांना एफआरपी देण्याबाबत लवकरच बैठक – मंत्री सुनिल केदार

मुंबई, दि. 21 : दूध उद्योग जिवंत राहिला पाहिजे. यासाठी दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यास मागणी आणि पुरवठा होऊ शकेल. खुल्या अर्थव्यवस्थेत आपण दूध उत्पादकांसमोर बंधने लादू शकत नाही. त्यामुळे दूध उत्पादनासंदर्भात एफआरपी देण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली असून याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली.

कोरोना काळात लॉकडाऊन वेळी दूध उत्पादकांकरिता दूध भुकटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज 60 टक्के दुग्ध व्यवसाय हा खाजगी लोकांचा आहे. त्यामुळे दूध व्यवसाय करतांना विक्री किंमतीवर निर्बंध ठेवणे योग्य नाही. यावर पर्याय म्हणून दुग्धव्यवसायात प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सदाशिव खोत, महादेव जानकर यांनी विचारला होता.

000

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यांचे अनुदान वाटप – रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे

मुंबई, दि. 21 : चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यात कृषी विभागांतर्गत एका शेतकऱ्याव्यतिरिक्त सर्व शेतकऱ्यांना शेततळी व बोडीचे अनुदान मागणीनुसार वाटप करण्यात आले असून शेतकरी मारोती वाजुरकर यांचे अनुदान द्यावयाचे राहिले असून याही शेतकऱ्याची रक्कम 31 मार्च 2022 पूर्वी देण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री रामदास आंबटकर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला होता.

000

अंमली पदार्थ सेवन व विक्री प्रकरणी विशेष मोहीम – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

मुंबई,दि. 21 : ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत उल्हासनगर येथे दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी एका नायजेरीयन व्यक्तीकडून अंमली पदार्थासह 1 लाख 20 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला असून त्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबई व उपनगरात अंमली पदार्थ सेवन व विक्री यास प्रतिबंध बसला पाहिजे यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व पोलीस उपायुक्तांना एक विशेष मोहीम हाती घेण्याबाबत सूचना देण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाचे सेवन व विक्री आढळून येईल त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असून विशेषत: शाळा व कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करून ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्तांसमवेत होणाऱ्या बैठकीत मुंबई आणि उपनगरात जो निर्णय घेण्यात येईल तोच निर्णय राज्यालाही लागू करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री रविंद्र फाटक, प्रविण दरेकर, ॲड निरंजन डावखरे, प्रविण दटके यांनी उपस्थित केला होता.

000