कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मक्लेश आंदोलनाअंतर्गत समितीच्या वतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडीची सुरुवात सोमवारी (दि. १७) होईल. त्याबाबतचे निवेदन कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे लेखाधिकारी सुनील रेणके यांना दिले.
वीस टक्के अनुदानपात्र सर्व शाळांना २९ जानेवारी २०२०च्या शासन निर्णयानुसार फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करून १०० टक्के अनुदान द्यावे. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी कृती समितीचा लढा सुरू आहे. या मागण्यांची पूर्तता करून विनाअनुदानित शाळा आणि शिक्षकांना शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, गजानन काटकर, जनार्दन दिंडे, शिवाजी खापणे, आनंदा वारंग, शिवाजी घाडगे, मच्छिंद्र जाधव, सावंत माळी, भानुदास गाडे, केदारी मगदूम, आदींचा समावेश होता.
विनाअनुदानित शिक्षक गेल्या २० वर्षांपासून शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत; पण अनेक प्रश्न, मागण्या अजून प्रलंबित आहेत. त्याच्या पूर्ततेबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. बहिष्काराच्या आंदोलनात राज्यातील ६५०० हजार विनाअनुदानित शाळा आणि त्यामधील सुमारे ४० हजार शिक्षक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. पायी दिंडीची सुरुवात पुणे येथे सोमवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता होईल. आठ दिवसांत दिंडी मुंबईत पोहोचणार आहे. त्यानंतर आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
– खंडेराव जगदाळे