दिल्लीः भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती अझीम प्रेमजी आज विप्रोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून कामातून कायमस्वरूपी निवृत्ती घेणार आहेत. यापुढे त्यांचा मुलगा रिषद प्रेमजी विप्रोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे.
अझीम प्रेमजी यांचा जन्म २४ जुलै १९४५ रोजी मुंबईतल्या एका गुजराती मुस्लिम कुटुंबात झाला होता. अझीम प्रेमजींचे कुटुंब मुळचे खान्देशातील अंमळनेरचे आहे. त्यांचे वडील मोहम्मद हाशिम प्रेमजी यांचा वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्टस् नामक खाद्यतेलाचा कारखाना होता तर ‘७८७’ नावाची कपडे धुण्याच्या साबणाची कंपनी होती.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी अझीम प्रेमजी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले होते. पण वडिलांच्या निधनामुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावं लागलं. सुरुवातीच्या काळात साबण आणि इतर सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायाचा त्यांनी विस्तार केला. भारतात संगणक आल्यानंतर येता काळ संगणकाचे असेल हे ओळखून त्यांनी संगणक व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी विप्रो कॉम्प्युटर्सची स्थापना केली. पुढे सॉफ्टवेअरच्या व्यवसायातही त्यांनी प्रवेश केला. आज विप्रो ही जगातील एक बलाढ्य संगणक कंपनी आहे. तब्बल ५३ वर्ष अझीम प्रेमजींनी व्हिप्रोची धुरा सांभाळली आहे.
अझीम प्रेमजींचा विवाह यास्मीन यांच्याशी झाला असून, त्यांना रिषद व तारीक ही दोन मुलं आहेत. अझीम प्रेमजी यांच्या या कामगिरीसाठी त्यांना बिझनेस वीकने ग्रेटेस्ट एंटरप्रेन्युअर हा पुरस्कार देऊन गौरवले होते. २००० साली मणिपाल विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केलं होतं. भारत सरकारने २००५मध्ये पद्मभूषण तर २०११मध्ये पद्मविभूषण पुरस्कारांनी प्रेमजी यांना सन्मानित केलं होतं.