![विभागस्तरावर ‘कृषी कक्ष’ स्थापन करणार – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे – महासंवाद विभागस्तरावर ‘कृषी कक्ष’ स्थापन करणार – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे – महासंवाद](https://mahasamvad.in/wp-content/uploads/2025/02/विभाग-स्तरावर-कृषी-कक्ष-स्थापन-करणार-4-696x693.jpg)
विभागातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद
नागपूर, दि. 13 : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. शासन शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे असून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, अडचणी व समस्या सोडविणे सुकर व्हावे यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विभागनिहाय प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील वनामती येथील सभागृहात शेतकऱ्यांनी अनेकविध सूचना, अपेक्षा, अडचणी कृषीमंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी कृषी आयुक्त सुरज मांढरे, अपर आदिवासी विकास आयुक्त रवींद्र ठाकरे, पाणी फाउंडेशनचे डॉ . अविनाश पोळ, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, क्षेत्र संचालक (पेंच) प्रभुनाथ शुक्ला, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्यासह विभागातील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
शेतकरी शेतात नवे-नवे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवत असतात. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाने पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी कृषी संलग्न विविध प्रात्यक्षिके आयोजित करावीत. तंत्रज्ञानामध्ये पुढे जात शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ए. आय. तंत्रज्ञान पोहोचविण्याचा मानस आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध असून यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री श्री. कोकाटे म्हणाले.
शेतक-यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठात अनेक नवनवीन प्रयोग होत असतात. या प्रयोगाची माहिती ही शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. शेतकरी हा प्रयोगशील असतो. त्यामुळे शेतक-यांचे प्रयोग हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मंत्री श्री. कोकाटे यावेळी म्हणाले.
शेतक-यांचे एकूण 13 गट आज सहभागी झाले होते. प्रत्येक गटात 20 शेतकरी याप्रमाणे विभागणी करण्यात आली होती. या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या अडचणी व सूचना मांडल्या. गडचिरोलीतील भामरागड ते नागपुरातील सावनेर अशा नागपूर विभागाच्या सर्वच भागातील शेतक-यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले. तर आभार विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी मानले.