नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण लीग 2020’ ला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिकेने ‘थ्री आर’ अर्थात कचरा कमी करणे, कच-यावर प्रक्रिया करणे तसेच कच-याचा पुनर्वापर करणे ( 3 ‘R’ – Reduce, Reuse and Recycle) या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रीत केले असून या विषयावर नुकतीच सोसायट्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ई कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे हा असून या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय ई कचरा दिनानिमित्त नागरिकांनी आपले घर, कार्यालय येथील ई कचरा नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये स्थापित ई कचरा संकलन केंद्रात देऊन पर्यावरण जपणुकीची सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे. ई-कचरा म्हणजे वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल वस्तूंचा पर्यावरणाला घातक असणारा कचरा. हा ई-कचरा हे केवळ टाकून द्यावयाचे भंगार साहित्य नसून त्याची शास्त्रीय पध्दतीने योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली नाही तर त्यामुळे पर्यावरणाची हानी होतेच शिवाय ते मानवी जीवनालाही घातक असते. म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांकडील संगणक, टिव्ही, फ्रिज, लॅपटॉप, ए.सी., मोबाईल फोन, कंप्रेसर, टेलिफोन, फॅक्स मशीन, इ.जी.बी.एक्स. मशीन, प्रिंटर, वॉशिंग मशीन, सी.डी., डिव्हिडी, फ्लॉपी, पेन ड्राईव्ह, टेप रेकॉर्डर, कॅसेट्स, वायर, केबल, स्विच, एक्सरे फिल्म्स, पंखे असा विविध प्रकारचा टाकावू ई-कचरा संकलीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मानवासह प्राणी जीवनालाही घातक असणाऱ्या या ई कचऱ्याची शास्त्रशुध्द रितीने योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच सकारात्मक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामध्ये जनतेचा स्वयंस्फूर्तीने सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तरी नागरिकांनी आपल्याकडील ई-कचरा कुठेही टाकून न देता अथवा भंगारवाल्याला न देता नजिकच्या महापालिका विभाग कार्यालयातील केंद्रात द्यावा व पर्यावरण जपणूक करावी असे आवाहन आहे.