विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
- Advertisement -

मुंबई दि, २४:- राज्यातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा संस्कृतीला वाव मिळावा, त्यांना कार्यस्थळी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील वर्षापासून नियमितपणे राबविले जाणार आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून दरवर्षी विभाग स्तरावर आणि राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात विभाग स्तरावर होणाऱ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर जानेवारी महिन्यात विभाग आणि राज्यस्तरावर होणाऱ्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी क्रीडा धोरण राबविण्यात आले आहे. महसूल विभागांतर्गत क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी राबविण्याची मागणी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्याकडून महसूलमंत्री यांच्याकडे करण्यात येत होती. या अनुषंगाने, राज्याचे क्रीडा धोरण तसेच अधिकारी, कर्मचारी, संघटनांच्या सूचनांचा विचार करत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय तथा विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात महसूल विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख या उपविभागांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक आज महसूल व वन विभागामार्फत जारी करण्यात आले आहे.  या निर्णयामुळे विविध महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनांची गेल्या अनेक वर्षांची मागणी महसूल मंत्री  श्री.विखे – पाटील यांच्याकडून पूर्ण झाली आहे.

- Advertisement -