नवी दिल्ली : ज्या खेळाडूने आयपीएलमधून आपल्या खेळाने देशभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं त्या सरफराज खानने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये वादळ निर्माण केलं आहे. मुंबईच्या रणजी टीमकडून खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद 301 धावा, हिमाचल प्रदेशविरुद्ध नाबाद 226 धावा आणि त्यानंतर सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात 78 धावा. म्हणजेच तब्बल 605 धावा फटकावल्यानंतरच सरफराज खान बाद झाला. या कामगिरीने सरफराजने नवा इतिहास रचला आहे.
बाद न होता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण याच्या नावावर होता. व्हीव्हीएस लक्ष्मणने बाद न होता 538 धावा केल्या होत्या. मात्र सरफराज खानने तीन सामन्यांमध्ये झंझावाती खेळी करत हा विक्रम मोडला आहे. मुंबईच्या रणजी टीमकडून खेळत असलेला सरफराज खान सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
ज्या सरफराज खानची रणजी क्रिकेटमध्ये बॅट तळपत आहे त्याच सरफराज खानला विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू (RCB) या संघातून काढण्यात आलं. त्यावेळी सरफराजच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. आरसीबी संघाबाहेर बसावं लागल्यानंतर सरफराजने आपल्या फिटनेसवर विशेष मेहनत घेतली आणि स्थानिक क्रिकेटच्या माध्यमातून जोरदार पुनरागमन केलं आहे.
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सध्या सरफराज खान गोलंदाजांच्या नाकी नऊ आणताना दिसत आहे. सरफराजने उत्तर प्रदेशविरोधात त्रिशक तर हिमाचल प्रदेशविरोधात दमदार द्विशतक झळकावलं. सौराष्ट्रविरोधातही त्याने मैदानावर चांगला जम बसवला होता. मात्र 78 धावांवर खेळत असताना तो बाद झाला. सरफराजने याच कामगिरीमध्ये सातत्य ठेवल्यास लवकरच त्याच्यासाठी भारतीय संघाचेही दरवाजे उघडू शकतात, असं क्रिकेट जाणकारांचं म्हणणं आहे.