Home ताज्या बातम्या विलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी शाळेचे बदलले रूपडे

विलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी शाळेचे बदलले रूपडे

संगमनेर -विलगीकरण कक्षात ठेवलेल्यांना भरपूर मोकळा वेळ मिळत आहे. काही जण समाजमाध्यवांवर हा वेळ खर्च करत आहेत, तर काही जण गाणी, चित्रपट पाहण्यात वेळ घालवत आहेत, तर काही जण त्यास शिक्षा समजत आहेत. मात्र तालुक्‍यातील सारोळे पठारावर येथील शाळेत विलगीकरण कक्षात ठेवलेल्या आठ व्यक्तींनी या वेळेचा सदुपयोग करून शाळेचेच रूपडेच बदलून टाकले आहे.

संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ येथील एका 68 व्यक्तीचा 8 मे रोजी करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला होता. सुरुवातीला मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने मयताच्या नातेवाईकांनी धांदरफळ येथे जाऊन मृताचे अंत्यदर्शन घेतले. मात्र दुपार होताहोता मृत व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्याने संपूर्ण तालुका हादरला. त्यानंतर प्रशासनाने 27 जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना त्यांच्या गावातील शाळांमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश निघाले. एव्हाना सारोळे पठारहून धांदरफळला गेलेल्या त्या आठ जणांनाही त्याची चाहूल लागली. नियमानुसार या सर्वांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दहा दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी आवश्‍यक ते साहित्य त्यांना दिले. करोना नियंत्रण समितीने शाळेतील दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी चार याप्रमाणे या आठही जणांच्या निवासाची सोय केली.

1 मार्चपासूनच बंद असल्याने सारोळे पठारच्या जिल्हा परिषद शाळेत सर्वत्र कचरा आणि धूळ साचली होती. मात्र एकाच दिवसात या आठ जणांनी ती स्वच्छ करुन या ज्ञानमंदिराची चमक वाढवली. तसेच हा उपक्रम त्यांनी पुढेही सुरूच ठेवला. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून ही मंडळी शाळेच्या स्वच्छतेला सुरुवात करतात. सध्या ते शाळेच्या प्रांगणातील झाडांना पाणी देणे, शाळेत औषध फवारणी करणे, अशी स्वेच्छेने करत आहेत. सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसत असताना जी झाडे जळून जाण्याच्या मार्गावर होती, ती आता नियमित पाणी मिळत असल्याने चांगलीच तरारली आहेत. अनेक झुडपांवर फुले लगडली आहेत. विलगीकरण कक्षात ठेवले जाणार, या विचाराने ज्यांना भीती वाटते, त्यांना या आठ जणांनी आपल्या कार्यातून चांगलीच चपराक लगावली आहे.

आमच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर तरारलेल्या झाडांवर संक्रांत येवू नये, म्हणून या आठ जणांच्या सूचनेवरुन ग्रामपंचायतीने एका ग्रामस्थाच्या मदतीने ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. विलगीकरणातील याच मंडळीने शाळेच्या हौदापासून प्रत्येक झाडापर्यंत ड्रीप बसवले. आज या सर्वांना संस्थात्मक विलगीकरणातून सुटी दिली गेली. मात्र गेल्या आठ दिवसांत त्यांनी केलेल्या कामातून जिल्हा परिषदेच्या शाळेचा चेहरामोहराही बदलला आहे. करोना नियंत्रण समितीने आज सकाळी जेव्हा त्यांना घरी जाण्यासाठी शाळेतून निरोप दिला, तेव्हा उपस्थित सगळ्यांनीच टाळ्यांचा गजर करीत त्यांच्या या सेवाकार्याला, या सत्कार्याला अभिवादन केले.

घरचा कर्ता विलगीकरणात गेल्याने त्यांच्या कुटुंबाची परवड होवू नये, म्हणून जिल्हा परिषदेचे सभापती अजय फटांगरे यांनी त्या सर्वांच्या घरात जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला. करोना नियंत्रण समितीच्या अध्यक्ष अहिल्याबाई घुले, उपसरपंच प्रशांत फटांगरे, सदस्य प्रशांत घुले, ग्रामसेवक संजय दारुलकर, तलाठी ताजणे अप्पा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोमीन, जवळे बाळेश्वरचे कामगार पोलीस पाटील खरात, घारगाव पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. बांबळे, डॉ. पूनम पांडे, डॉ. ढाले व कर्मचारी, आशा सेविका शबनम मोमीन, खडसे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संकटातील हे दहा दिवस अहोरात्र परिश्रम घेवून संक्रमीताच्या संपर्कात येवूनही त्या’ आठ जणांसह संपूर्ण गावाला करोनापासून दूर ठेवण्यात यश मिळविले.