Home शहरे औरंगाबाद वीजचोरीमुळे घरातील मीटर जाणार खांबावर

वीजचोरीमुळे घरातील मीटर जाणार खांबावर

औरंगाबाद : शहरातील वाढत्या वीज गळतीवर मात करण्यासाठी महावितरणने शहरातील सर्वाधिक वीजहानी असलेल्या ३७ फिडरवर उघड्या तारांऐवजी ‘एरिअल बंच केबल’ (एबीसी) व खांबावर मल्टीमीटर बॉक्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

शहरात महावितरणचे सर्व मिळून ३ लाख ७ हजार वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना जवळपास ११ केव्ही क्षमतेच्या १५१ फिडरवरून वीजपुरवठा होतो. यातील ६४ फिडर हे एक्स्प्रेस फिडर आहेत. त्यावरून प्रामुख्याने उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा होतो, तर उर्वरित ८७ फिडरवरून घरगुती, व्यावसायिक ग्राहकांना वीजपुरवठा होतो. यापैकी ३७ फिडरवरील वीजगळती ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. वीजचोरीसह अनधिकृत वीज वापराचे प्रमाणही याच फिडरवर जास्त आहे. या ३७ फिडरवरील ६९ हजार वीज मीटर बदलण्यात येणार असून, ते सर्व मीटर खांबावर मल्टीमीटर बॉक्समध्ये बसविले जाणार आहेत. या कामासाठी जवळपास ३८ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आॅगस्ट महिन्यात या कामाची सुरुवात केली जाणार आहे.

या योजनेत शहरातील जास्त वीज गळती असलेल्या भागात एरिअल बंच केबल लावल्या आहेत. एरिअल बंच केबल इन्सुलेटेड केबल असून, त्यावर आकडा टाकून वीजचोरी करता येत नाही. इन्सुलेशन असल्याने या केबलला चुकून स्पर्श झाला तरी अपघाताचा धोका नसतो. केबलचा एकमेकींना स्पर्श झाला तरीही वीजपुरवठा खंडित होत नाही. शहरातील सध्या विविध भागांत असलेल्या खांबांवरील २६५.३३ कि.मी. अंतराच्या तारा काढून त्याठिकाणी एरिअल बंच केबल बसविण्यात येणार आहेत. 

वीज गळतीवर उपाय म्हणून काही ग्राहकांचे मीटर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. शहरातील अनेक भागांतील ग्राहकांच्या घरात वीज मीटर बसविण्यात आले आहेत. नवीन योजनेत ग्राहकांच्या घरात लावलेले मीटर विद्युत खांबांवर मल्टीमीटर बॉक्समध्ये बसविण्यात येणार आहेत. एका मल्टीमीटर बॉक्समध्ये सुमारे १२ मीटर बसविण्यात येतील. या बॉक्सची चावी महावितरणच्या तंत्रज्ञांकडे किंवा मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीकडे राहील. खांबावर ८ हजार २८७ मीटर बॉक्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये ६९ हजार ५५४ ग्राहकांचे मीटरही बसविण्यात येणार आहेत. 

कोणते फिडर महावितरणच्या रडारवर
पॉवर हाऊस उपविभागातील मकबरा, पॉवर हाऊस, वसंत भवन, पाणचक्की, सिटीचौक पोलीस ठाणे, छावणी उपविभागातील राहुलनगर, दर्गा, पेठेनगर, छावणी, प्रियदर्शिनी, मिलिंद महाविद्यालय, आयटीआय, होलिक्रॉस, शाहगंज उपविभागातील रोशनगेट, गणेश कॉलनी, जसवंतपुरा, जकात नाका, आझाद चौक, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, कटकटगेट, दिल्लीगेट, आरती, जमन ज्योती, भीमटेकडी, सुभेदारी, वॉटर वर्क्स, रोझाबाग, चिकलठाणा उपविभागातील चिकलठाणा, संजयनगर, नारेगाव, सारासिद्धी व क्रांतीचौक उपविभागातील निझामुद्दीन, मोंढा, सेव्हन हिल, दूध डेअरी, रंगमंदिर, आयटीआय या सर्वाधिक वीजगळती असलेल्या फिडरवर या योजनेतील कामे केली जाणार आहेत.