वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
- Advertisement -




मुंबई, दि. ०४: कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. ‘महानिर्मिती’ने  गारे पेल्मा- दोन जीपी-2 (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा खाणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वीज निर्मितीसाठी विविध कंपन्यांकडून मिळणारा कोळसा चांगल्या दर्जाचा मिळावा, तसेच तो वेळेत मिळावा यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. छत्तीसगड येथील रायगढ जिल्ह्यातील गारे पेल्मा दोन (GPII)  कोळसा खाणीला  शासनाच्या सर्व परवानग्या प्राप्त करून ‘महानिर्मिती’ने कोळसा उत्पादनाबाबत सर्वसमावेशक असा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून त्याला मान्यता घ्यावी. वीज निर्मिती करताना उत्पादन खर्च कमी करून  ग्राहकांना कमी दरात वीज उपलब्ध व्हावी, यासाठी ‘महानिर्मिती’कडून कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी ‘महानिर्मिती’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांनी कोळसा खरेदी व महानिर्मितीकडून करण्यात येत असलेली विजनिर्मिती याबाबत माहिती सादर केली.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 







- Advertisement -