
- पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानंतर तीन वीरपत्नींना प्रत्येकी 1 हेक्टर शेतजमीन; जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही
धुळे, दि. १६ नोव्हेंबर : देशाच्या रक्षणासाठी आपल्या पतीचे बलिदान देणाऱ्या वीरपत्नींच्या आयुष्यातील पोकळी कधीही भरून निघू शकत नाही. मात्र, त्यांच्या त्यागाचा सन्मान राखत कुटुंबाला सुरक्षित भविष्याचा आधार देणे, ही समाज आणि शासनाची जबाबदारी आहे. याच संवेदनशील भावनेतून धुळे जिल्ह्यातील तीन वीरपत्नींच्या शेतजमिनीचा प्रश्न मार्गी लागला आहे. पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करून तीन वीरपत्नींना नवलाणे ता.जि.धुळे येथे प्रत्येकी 1 हेक्टर शेतजमीन मंजूर केली आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री. रावल यांनी वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नींची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. या भेटीदरम्यान शेतजमिनीचा प्रश्न समोर आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. केवळ आश्वासन न देता संबंधित कुटुंबांना प्रत्यक्ष न्याय मिळावा, यासाठी त्यांनी प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले होते.
या निर्देशांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने प्रलंबित प्रस्तावांची छाननी करून पात्र कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया पुढे नेली. त्यानुसार वीरपत्नी अरुणा मुंग्या राऊत (मु. पो. वाडीभोकर, ता. जि. धुळे), माया मनोहर पाटील (मु. पो. न्याहळोद, ता. जि. धुळे) आणि रुपाली मनोज गायकवाड (मु. पो. चिंचखेडे, ता. जि. धुळे) यांना प्रत्येकी 1 हेक्टर शेतजमीन धुळे तालुक्यातील नवलाणे येथे मंजूर करण्यात आली आहे.
या प्रकरणात नवलाणे येथील सरपंच भिमाभाऊ सूर्यवंशी यांनी दाखविलेली सकारात्मक भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. वीरपत्नींच्या कुटुंबांना शेतजमीन मिळावी, यासाठी त्यांनी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची भूमिका घेतली. त्यांच्या या औदार्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी विशेष कौतुक केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन आणि प्रशासनाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अशा प्रकारे उभे राहणे, ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त झाली.
तीन वीरपत्नींच्या कुटुंबांना नवा आधार
पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत स्वतःच्या हक्काची शेतजमीन मिळणे ही केवळ मालमत्तेची बाब नसून कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयामुळे तीन वीरपत्नींच्या कुटुंबांना भविष्यात शेतीच्या माध्यमातून स्वावलंबनाचा आधार निर्माण होऊ शकणार आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या अडचणींकडे केवळ प्रशासकीय प्रकरण म्हणून न पाहता संवेदनशीलतेने लक्ष देण्याची भूमिका या कार्यवाहीतून अधोरेखित झाली आहे. पालकमंत्री श्री. रावल यांचे निर्देश, जिल्हा प्रशासनाची कार्यवाही आणि नवलाणे येथील सरपंच श्री. सूर्यवंशी यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी यामुळे वीरपत्नींच्या कुटुंबांना दिलासा देणारा हा निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला.
यापूर्वी शहीद सैनिक पंढरीनाथ गबाजी सूर्यवंशी यांच्या मातोश्री वीरमाता इंदुबाई गबाजी सूर्यवंशी यांनाही पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते शेतजमिनीचे दस्तऐवज प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी तीन वीरपत्नींच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागल्याने सैनिक कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पुढचे पाऊल मिळाले आहे.
वीरांच्या कुटुंबांचा सन्मान ही आपली जबाबदारी – पालकमंत्री जयकुमार रावल
देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांचे ऋण कधीही फेडता येणार नाही. मात्र, त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगता यावे, यासाठी शासन आणि प्रशासनाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नींच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याची भूमिका पालकमंत्री श्री. रावल यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या भेटीदरम्यान मांडली होती.
तीन वीरपत्नींना शेतजमीन मंजूर झाल्याने त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. या कार्यवाहीत नवलाणे येथील सरपंचांनी दाखविलेल्या औदार्याचे कौतुक करताना पालकमंत्री श्री. रावल यांनी त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मृती जपण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे, हाच त्यांच्या त्यागाचा खरा सन्मान ठरणार आहे.
००००

WhatsApp