Home शहरे पुणे वेताळ टेकडीवर ८७ प्रकारची फुलपाखरे

वेताळ टेकडीवर ८७ प्रकारची फुलपाखरे

0
वेताळ टेकडीवर ८७ प्रकारची फुलपाखरे

पुणे : व्यायामासाठी येणाऱ्या शेकडो पुणेकरांना शुद्ध हवा देणाऱ्या वेताळ टेकडीवरील (एआरएआय) जैवविविधता समृद्ध आहे. वनसंपदेतील वैविध्यामुळे या टेकडीवर पाच-दहा नाही, तर सुमारे ८७ प्रकारची फुलपाखरे वास्तव्यास असल्याचा शोधनिबंध पर्यावरणशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केला आहे. चार वर्षांच्या अभ्यासातून तयार झालेला हा अहवाल ‘जर्नल ऑफ इकॉलॉजिकल’ सोसायटीमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

पश्चिम घाटातील डोंगररांगांचा भाग असलेल्या टेकड्या पुण्याच्या चहूबाजूला बघायला मिळतात. पावसाळ्यात हिरव्यागार वाटणाऱ्या या टेकड्या उन्हाळ्यात बोडक्या वाटतात. प्रत्यक्षात या टेकड्यांवर अनेक प्रकारच्या वनस्पती विखुरल्या आहेत. त्यामुळे त्यावर राहणाऱ्या पक्षी आणि फुलपाखरांत विविधता दिसते. मात्र, अलीकडील काही वर्षांत त्यांचा सविस्तर अभ्यास झालेला नाही. हीच गरज ओळखून पर्यावरणशास्त्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या रजत जोशी, अद्वैत चौधरी, अथर्व बापट, स्वानंद ओक आणि कल्याणी बावा या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वेताळ टेकडीवरील फुलपाखरांच्या नोंदी घेण्याचे ठरवले. प्राथमिक नियोजनानंतर ऑगस्ट २०१७मध्ये प्रकल्पास सुरुवात झाली.

सर्वेक्षणाची माहिती देताना रजत जोशी म्हणाले, ‘टेकडीवरील खाणीपासून टेकडीला जोडणाऱ्या पाषाण, कांचनगल्ली, पौड फाटा रस्ता, गोखलेनगरकडून येणाऱ्या पायवाटांचाही अभ्यास केला. यासाठी ‘लाइन ट्रान्झॅक्ट’ पद्धत वापरली. फुलपाखरांची निरीक्षणे नोंदवली, त्यांचे फोटो टिपले, फुलपाखरू वॉक करून नागरिकांमध्ये फुलपाखरांबद्दल जागृती केली. ही फुलपाखरे कोणत्या झाडावर, गवतावर बसतात, याच्या नोंदी घेतल्या; शिवाय हंगामानुसार टेकडीवर येणाऱ्या फुलपाखरांचा अभ्यास केला आहे. सर्वेक्षणाला सुरुवात केली, तेव्हा ८७ प्रकारची फुलपाखरे असतील, असे आम्हाला वाटले नव्हते; पण जशा नोंदी मिळत गेल्या, तसे टेकडीवरील वनस्पतींमधील वैविध्याचे महत्त्व उलगडले. फुलपाखरे अंडी कोणत्या झाडांवर घालतात येथपासून त्यांच्या जीवनचक्राचेही फोटो टिपले आहेत.’

टेकडीवरील दगडखाणीतील परिसंस्था वेगळी आहे. तिथे वेगळ्या प्रकारची फुलपाखरे दिसली. जैवविविधता जपली, तरच टेकडीवरील विविध जीवांचे संवर्धन होईल, असा संदेश अहवालातून अधोरेखित केल्याचेही जोशी यांनी सांगितले.

टेकड्या, वनक्षेत्राला लागून असलेल्या रिकाम्या जागांवर कोणत्याही बांधकाम प्रकल्पास परवानागी देण्यापूर्वी तेथील परिसंस्थेचा अभ्यास झाला पाहिजे. सर्वेक्षण झाल्यास शास्त्रीय मुद्द्यांच्या आधारे आपण प्रकल्पाला विरोध करू शकतो. वेताळ टेकडीवरील फुलपाखरांच्या अभ्यासातून तेथील झाडे, झुडपांचे महत्त्व पुढे आले. एकूण परिसंस्था समजून घेण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. लवकरच पक्ष्यांचाही अभ्यास करण्याचा विचार आहे.

– रजत जोशी,

फुलपाखरू सर्वेक्षण सदस्य

टेकडीवर दिसलेली फुलपाखरे

टेकडीवर ब्लू पॅन्झी (गवताळ प्रदेशाचे प्रतीक), ब्लू मॉरमॉन (राज्य फुलपाखरू), कॉमन शॉट सिल्व्हर (बाभळी, काटेरी वृक्षांवर आढळणारे फुलपाखरू), प्लेन्स ब्लू रॉयल (पुण्यात पहिल्यांदाच नोंद झालेले) यांसह ओक लिफ, सिल्व्हर लाइन, कॉमन जय, कॉमन मॉरमॉन, स्मॉल ग्रास यलो, प्लेन टायगर, ग्लासी टायगर अशी वेगवेगळ्या अधिवासात दिसणारी ८७ प्रकारची फुलपाखरे सर्वेक्षणात दिसली आहेत.

Source link