ठाण्यातील वर्तनगर परिसरातील वेदांत रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीकडून नुकताच अहवाल सादर करण्यात आला आहे. भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली स्थापन सहा सदस्य समितीने या प्रकरणी रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करून अहवाल तयार केला. जिल्हाधिकारी यांना हा अहवाल सादर झाला आहे. वेदांतमधील चार मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहेत.
ठाण्यातील वर्तनगर येथील रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी ऑक्सिजन पुरवठ्यामुळे रुग्णांचे मृत्यू ओढावल्याचा आरोप केला होता. रुग्णालय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने आणि केवळ बिलाची मागणी केली जात असल्याने रुग्णालयाच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मृतांची संख्येवरून भाजप आणि मनसेकडूनही संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णांच्या नातेवाईकांची आणि रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सहा सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. ज्यामध्ये महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी वैजयंती देवगेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उपायुक्त संदीप माळवी, बायोमेडिकल इंजिनीअर मंदार महाजन या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
‘नातेवाईकांना माहिती द्या’
सर्व कागदपत्रांचे, निदान अहवालांचे अवलोकन केल्यानंतर तसेच रुग्णांचे नातेवाईक, हॉस्पिटलमध्ये उपचार करणारे डॉक्टर व नर्सेस, ऑक्सिजनची यंत्रणा सांभाळणारे तंत्रज्ञ, आयसीयू मध्ये उपचार घेणारे रुग्ण, महापालिकेचे अधिकारी यांच्या लेखी जबाबावरून समितीने आपले निष्कर्ष सादर केले आहेत. संबंधित रुग्णांवर करोना प्रोटोकॉलनुसारच उपचार करण्यात आले आहेत. परंतु नातेवाईकांना रुग्णांची माहिती तसेच उपचार आणि रुग्णाच्या प्रकृतीतील बदल यांची माहिती नियमित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली नसल्याच्या तक्रारींबद्दल तशी माहिती देण्याच्या सूचना समितीकडून रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.