वेर्णा महामार्गावरील भीषण अपघातात चालकाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

- Advertisement -

वास्को : भरधाव वेगाने जात असताना दक्षिण गोव्यातील वेर्णा महामार्गावर समोरून जात असलेल्या अन्य एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या ट्रेलर ट्रक वाहनाची ‘स्विफ्ट डिजायर’ चारचाकीला समोरासमोरून जबर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ताळगाव येथील २० वर्षीय रसल फर्नांडीस या युवक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सापडलेल्या त्या चारचाकीत पती – पत्नीसहीत त्यांची दोन मुले प्रवास करत असून या अपघातात हे चार जणांचे कुटूंब गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक किरण नाईक यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सदर भीषण अपघात घडला. ताळगाव येथे राहणारा रसल फर्नांडीस हा २० वर्षीय युवक ‘स्वीफ्ट डीजायर’ टॅक्सी ने (क्र: जीए ०५ टी ५०६७) एका कुटूंबाला घेऊन मडगावच्या दिशेने जात होता. पिर्णी जंक्शन पार करून त्याची चारचाकी वेर्णा महामार्गावर पोचल्यानंतर रसलने त्याच्या वाहनाच्या पुढे असलेल्या अन्य एका वाहनाला ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी समोरून येणा-या कंटेनर ट्रेलर ट्रक (क्र: एमएच ४३ व्हाय ३४४६) ने रसल चालवत असलेल्या चारचाकीला जबर धडक दिल्यानंतर त्याची चारचाकी यामार्गावरून जाणा-या अन्य एका चारचाकीला धडकली अशी माहिती पोलीसांनी दिली. ट्रेलर ट्रक ची जबर धडक रसल चालवत असलेल्या चारचाकीला बसल्याने त्याच्या चारचाकीचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

सदर अपघाताची माहीती मिळताच वेर्णा पोलीसांनी तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन चारचाकी चालक रसल तसेच या वाहनात प्रवास करत असलेल्या वेलेंन्टीन कॉस्ता (वय ४८), सेंन्ड्रा कॉस्ता (वय ४६), एलिनो कॉस्ता (वय १३) व एल्रीको कॉस्ता (वय ९) यांना त्वरित वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी इस्पितळात नेले. रसल फर्नांडीस यास मडगावच्या हॉस्पिसीयो  रुग्णालयात नेला असता येथे येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. सदर अपघातात जखमी झालेल्या त्या चार जणाच्या कुटूंबाला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सेंन्ड्रा ची प्रकृती थोडी चिंताजनक असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक यांनी दिली.

अपघातात सापडलेल्या त्या चारचाकीत प्रवास करणारे हे कुटुंब राय, नुवे येथील असल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे. वेर्णा पोलिसांनी सदर अपघाताचा तसेच मयत रसल फर्नांडीस याच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -