Home ताज्या बातम्या वैभववाडी तालुक्यात मुसळधार, बहुतांश शाळा दुपारनंतर सोडल्या

वैभववाडी तालुक्यात मुसळधार, बहुतांश शाळा दुपारनंतर सोडल्या

वैभववाडी : पहाटेपासून मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे तब्बल २३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून संततधार सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, करुळ आणि भुईबावडा घाटात काही ठिकाणी किरकोळ दगड रस्त्यावर कोसळले होते. परंतु त्यांचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तर तालुक्यातील बहुतांशी शाळांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली.

अतिवृष्टीमुळे काही गावातील भातशेती आणि बागायतीमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तालुक्यात पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून थांबून-थांबून मुसळधार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत होते. तालुक्यातील शुक, शांती नदी ओसंडून वाहत आहेत. 

शांतीनदीचे पाणी तर पात्राबाहेर जाऊन बागायतींमध्ये घुसले होते. दुपारपर्यंत  पावसाचा जोर कायम होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे तालुक्यातील बहुतांश शाळांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली.

दरम्यान, करुळ आणि भुईबावडा घाटांत रस्त्यावर किरकोळ दगड कोसळले होते. परंतु, त्याचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेले दगड बाजूला करण्यात आले. मात्र, या अतिवृष्टीमुळे पुढच्या दोन-तीन दिवसांत घाटांमध्ये पडझड वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सायंकाळी चारनंतर पावसाचा जोर थोडासा कमी झाल्याने नदीकाठच्या वस्त्यांचा महापुराचा धोका टळला आहे.