Home ताज्या बातम्या व्यवसायासाठीच्या भांडवलातून मौजमस्ती…नंतर आत्महत्येच्या इशाऱ्याची चिठ्ठी

व्यवसायासाठीच्या भांडवलातून मौजमस्ती…नंतर आत्महत्येच्या इशाऱ्याची चिठ्ठी

0
व्यवसायासाठीच्या भांडवलातून मौजमस्ती…नंतर आत्महत्येच्या इशाऱ्याची चिठ्ठी

म. टा. खास प्रतिनिधी
: लॉकडाउनमध्ये हाताला काहीच काम नसल्याने एका अल्पवयीन मुलाने कर्जाच्या स्वरूपात अनेकांकडून पैसे घेतले. कामासाठी कमीच आणि मौजमस्तीसाठीच यातील बहुसंख्य रकमेचा वापर केला. पैसे परत करण्याची वेळ येताच हा मुलगा इन्स्टाग्रामवर आत्महत्येची चिठ्ठी लिहून गायब झाला. जीवाचे बरेवाईट करण्याआधीच पोलिसांनी त्याला शोधून काढले.

साकीनाका येथे राहणाऱ्या रमण (बदललेले नाव) याने करोना काळात सॅनिटायझर आणि इतर वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अनेक किरकोळ विक्रेत्यांकडून या वस्तू पुरविण्यासाठी कर्ज स्वरूपात तसेच आगाऊ अशी सुमारे ४५ लाख रु.ची रक्कम जमा केली. थोडे दिवस प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यानंतर मिळालेल्या रकमेतून त्याने मौजमस्ती सुरू केली. निर्बंध शिथिल होताच काही मित्रांना सोबत घेऊन तो देशात अनेक ठिकाणी फिरून आला. पैशांची मदत केलेल्या व्यक्तींच्या कानावर रमण याची मौजमस्ती आल्यानंतर त्यांनी पैशासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. ऐनवेळी पैसे आणणार कुठून अशा विचारात रमण याने इन्स्टाग्रामवर आत्महत्येची चिठ्ठी लिहिली आणि मोबाइल बंद करून गायब झाला.

रमणचा काहीच पत्ता लागत नसल्याने चिंतेत असलेल्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. अल्पवयीन मुलगा आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याने गुन्हे शाखा युनिट १०च्या पथकानेही त्याचा शोध सुरू केला. प्रभारी पोलिस निरीक्षक महेश ठाकूर यांच्या पथकाने रमणच्या मित्रांवर लक्ष केंद्रित केले. यावेळी एका मित्राच्या मोबाइलवर तो फोन करीत असल्याचे समजले. पोलिसांनी रमणच्या मित्राला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असतानाच रमण याचा फोन आला आणि तो विरार येथे असल्याचे कळले. पोलिसांनी विरार येथे जाऊन रमण याला ताब्यात घेतले आणि आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या या मुलाला आत्महत्येपासून परावृत्त केले.

अशी उधळपट्टी

सॅनिटायझर व इतर वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायासाठी किरकोळ विक्रेत्यांकडून कर्ज तसेच आगाऊ रक्कम घेतली. एकूण सुमारे ४५ लाख रु. जमा केले. यातूनच संबंधित मुलाने मौजमस्ती सुरू केली. काही मित्रांना सोबत घेऊन तो देशात अनेक ठिकाणी फिरून आला.

अशी पळवाट

मुलाची मौजमस्ती समजल्यानंतर कर्ज दिलेल्यांनी पैशासाठी तगादा लावला. अचानक पैशांची मागणी झाल्याने रमण याने इन्स्टाग्रामवर आत्महत्येची चिठ्ठी लिहिली आणि मोबाइल बंद करून गायब झाला. मित्राच्या संपर्कात असल्याने त्याचे राहण्याचे ठिकाण शोधण्यात आले.

Source link