हायलाइट्स:
- बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीचा दणका
- तब्बल ४०.३४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त
- परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात ‘फेमा’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांनी दुबईच्या रोचडेल असोसिएट्स लिमिटेडमधील समभागांच्या बदल्यात ४०.३४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता दुबईत खरेदी केली. हा व्यवहार करताना परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात ‘फेमा’ चे उल्लंघन केले. या कायद्यानुसार परदेशातील मालमत्तेइतकी संपत्ती भारतात जप्त केली जाते.
यानुसार ‘ईडी’ने केलेल्या कारवाईच्या अंतर्गत, भोसले यांच्या तीन पंचतारांकित हॉटेल्स असलेल्या क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, पुण्यातील हॉटेल वेस्टइन, नागपूरचे हॉटेल ला मेरिडीयन, गोव्याचे हॉटेल डब्लू रीट्रिट व अविनाश भोसले इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडमधील समभाग जप्त करण्यात आले. त्याखेरीज त्यांच्या व कुटुंबियांच्या नावे विविध बँक खात्यामध्ये असलेली १.१५ कोटी रुपयांची रोखदेखील जप्त करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी आणखी तपास सुरू आहे.
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं. गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.