Home शहरे मुंबई शताब्दी रुग्णालयात मद्यधुंद महिलेची डॉक्टरांना मारहाण

शताब्दी रुग्णालयात मद्यधुंद महिलेची डॉक्टरांना मारहाण

मुंबई : कांदिवली शताब्दी हॉस्पिटलच्याडॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केले. बुधवारी रात्री एका दारु प्यायलेल्या महिलेला पोलीस काही कारणासाठी शताब्दी रुग्णालयात घेऊन गेले होते. हिमानी शर्मा असे त्या महिलेचे नाव होते. या महिलेने रात्री हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत डॉक्टर्स, स्टाफ आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. या वादात या महिलेने पोलीस आणि डॉक्टरांना मारहाण केली. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला.
या रुग्णालयात मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली ते वसई, पालघर आणि काही रुग्ण ठाण्यावरून ही येतात. पण, गुरूवारी सकाळपासून बाह्य रुग्ण विभाग बंद असल्याकारणाने रुग्णांना परत फिरावे लागले. याविषयी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले की, एका महिलेने हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री गोंधळ घातला. या महिलेने पोलीस आणि ऑन ड्युटी असणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांना मारहाण केली. त्यामुळे सकाळपासून डॉक्टरांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. सकाळी आठ वाजताची ओपीडी बंद होती. पण, आता पुन्हा काम सुरू झाले आहे. डॉक्टर्स आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. हॉस्पिटलमधील ओपीडी सकाळी बंद ठेवण्यात आली होती. सकाळी ८.१५ वाजता ओपीडी स्लिप काउंटर बंद करून सर्व रुग्णांना बाहेर काढले गेले. त्यामुळे, सर्व रुग्ण आरडाओरड करत होते. महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी रुग्णालय प्रशासनासोबत चर्चेअंती आंदोलन ५ जुलै २०१९ पर्यंत स्थगित केले.