शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Advertisement -

ठाणे, दि. 27 (जिमाका) : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दि. 4 जून 2023 रोजी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचे रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असे वसतिगृह देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना दिले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण करून, सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून 90 दिवसात वसतिगृहाचे पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाचे कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात, तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

वसतिगृहाचे उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचे लोकार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देवून या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. त्या मातांशी त्यांनी संवादही साधला.

याप्रसंगी, आयुक्त श्री. बांगर यांनी दोन्ही प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. तसेच, विद्यार्थी प्रतिनिधींनी पत्र रुपाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत आढळून येणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करुन शहरातील गर्भवती महिला, नवजात शिशू यांना उत्तम प्रतीच्या अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना’ सुरू केली आहे.या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

 १. या योजनेत प्रसुतीगृहांचे बळकटीकरण करुन दिवस-रात्र तातडीची सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणे, जेणेकरुन माता मृत्यू दर कमी होणेस मदत होईल.

२. महानगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाव्यतिरिक्त कोपरी प्रसुतीगृह येथे 18 खाटांचे एसएनसीयू तयार करणे. यामुळे अर्भक मृत्यू दर कमी करणेस मदत होईल.

  1. गरोदर माता12आठवडयाच्या आतील नोंदी, अति जोखमीच्या मातांची विशेष काळजी, रक्तक्षय असणा-या मातांचा पुन: तपासणी इत्यादी करिता आशा स्वयंसेविकांसाठी अतिरिक्त कामावर आधारित मोबदला देणे.
  2. जोखमीच्या गरोदर मातांना पोषण आहाराकरिता अनुदान देऊन मातेची व बाळाची पोषण विषयक स्थिती सुधारणे.
  3. महापालिकेचे प्रसुतीगृह व रुग्णालयांमध्ये प्रसुत होणाऱ्या मातांना मातृत्व भेट म्हणून उपयोगी वस्तूंचे संकलन करुन एक किट देणे. सदर किटचा वापर प्रसुतीपश्चात मातेची व बाळाची काळजी घेण्यास होईल. याप्रमाणे एक वर्ष कालावधीसाठी एकूण10हजार प्रसूतींकरिता सदरचे किट मातृत्व भेट म्हणून देण्यात येईल.
  4. शहराच्या विशिष्ट प्रभागांमध्ये नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पुरुष स्वयंसेविकांना मोबदला अदा करणे.
  5. महापालिकेच्या कॉल सेंटरव्दारे गरोदर मातांना संपर्क करुन त्यांनी घ्यावयाची काळजी,औषधे,चाचण्या लसीकरण तसेच बालकांचे लसीकरण याबाबत माहिती उपलब्ध करुन देणे.

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृह राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात दिलेल्या भेटीत वसतिगृहाची दुरवस्था पाहून तेथील मुलांशी संवाद साधून सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. सद्य:स्थितीबाबत सर्व प्रशिक्षणार्थींनी वसतीगृह तसेच कॅन्टीनच्या समस्या त्यांच्याजवळ मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी निर्देश देवून अत्यंत चांगल्या दर्जाच्या सेवासुविधा निवासी डॉक्टरांना उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे नमूद केले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे असलेल्या वसतीगृहाच्या इमारत नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आणि काम सुरू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत या वसतिगृहाचे पूर्ण रूप पालटून टाकण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 11 कोटी रुपये खर्च आला. वसतिगृहाचे काम सुरू करण्यापूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानुसार इमारतीतील कॉलम्स, बीम, स्लॅब आदीची डागडुजी सर्वोच्च दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. प्रत्येक खोलीत दोन बेडस्, फर्निचर, अभ्यास करण्यासाठी टेबल, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे वसतीगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये भरपूर उजेड येईल अशी रचना केली आहे. मोकळ्या जागेतील प्रकाश व्यवस्था, रुममधील फरशी, रंग याबाबतची निवड काळजीपूर्वक करण्यात आली आहे. त्यासोबत, या इमारतीच्या तळमजल्यावर उत्तम सुविधांनी युक्त व्यायामशाळा आणि अद्ययावत कॅन्टीन तयार करण्यात आले आहे.

000

- Advertisement -