Home ताज्या बातम्या शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास चर्चा

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास चर्चा

0
शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास चर्चा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी दक्षिण मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी तीन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता असल्याचा संदर्भ या उभयतांच्या भेटीला असल्याचे सूत्रांकडून समजते.

केंद्राच्या विरोधात जनमानसातील भावना प्रबळ होत आहे. त्यात वाढती महागाई, करोनाची साथ आटोक्यात आणण्यातील अपयश, वाढती बेरोजगारी व अन्य आर्थिक धोरणांचा परिणाम देशाच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावूनही तेथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एकहाती बहुमत मिळवले. ‘तृणमूल’च्या या रणनीतीत प्रशांत किशोर यांचा निवडणूक आराखडा कामी आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील बदलत्या घटना आणि त्यानुसार झालेल्या प्रचार व त्यातील काही किस्से याविषयी शरद पवार यांना प्रशांत किशोर यांनी माहिती दिल्याचे कळते.

सुमारे तीन तासांच्या या बैठकीदरम्यान, काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार उपस्थित असल्याचे समजते.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या ‘लंच डिप्लोमसी’त देशाच्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीनंतर शरद पवार दुपारी मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले. मात्र, मुंबईतील राजकीय वर्तुळात या बैठकीची दिवसभर चर्चा रंगली होती. दरम्यान, प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील ही राजकीय भेट नाही. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून, त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीचा सल्ला घेण्यासाठी अनेक नेते त्यांना भेटत असतात. त्यानुसार प्रशांत किशोर हे त्यांना भेटले असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.

‘राजकीय वातावरण बदलतेय’

देशातील राजकीय वातावरणात बदल होत असल्याचे शरद पवार व प्रशांत किशोर यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांकडून समजते. आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असून, विरोधकांची एकजूट झाली, तर वेगळे चित्र दिसू शकते. यामुळे विरोधकांची मोट कशी बांधता येईल, यावरही चर्चा झाल्याचे समजते.

Source link