Home अश्रेणीबद्ध शहरातील महाविद्यालयांचे पार्किंग शुल्कही व्हावे बंद : विद्यार्थी संघटनांची मागणी

शहरातील महाविद्यालयांचे पार्किंग शुल्कही व्हावे बंद : विद्यार्थी संघटनांची मागणी

पुणे: महापालिकेने मॉल्स आणि मल्टिप्लेक्सचे पार्किंग शुल्क बंद करण्याचे आदेश दिले असून शहरात या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांकडून वसूल केले जाणारे पार्किंग शुल्क बंद करावे. तसेच पार्किंग शुल्काच्या नावाखाली महाविद्यालयांकडून पोसल्या जाणा-या कंत्राटदारांंना बाहेर काढावे,अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी काढलेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या पार्किंग नियमावलीला महाविद्यालयांनी केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून काढले जाणारे आदेश केवळ महाविद्यालयातील फाईल फोल्डरमध्ये जमा करण्यासाठी आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मल्टिप्लेक्स व मॉल्सकडून पार्किंगच्या नावाखाली ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लुट केली जात होती.मात्र,पुणे महापालिकेने याबाबत ठराव केल्यामुळे पार्किंग शुल्क बंद झाले.पार्किंग शुल्क आकारण्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे मल्टिप्लेक्स व मॉल्समध्ये जाणा-या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. परंतु,महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांकडून पार्किंगसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली जाते. ब-याच वेळा कंत्राटदारांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी नियुक्त केल्या जाणा-या व्यक्तींकडून विद्यार्थ्यांशी उध्दटपणे संवाद साधतात. तसेच महाविद्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची मोडतोड झाली तरीही त्याबाबत नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे सर्व महाविद्यालयांचे पार्किंग शुल्क बंद करावे,अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
————————
मल्टिप्लेक्स व मॉल्समध्ये पालिकेकडून मोफत पार्किंगचा निर्णय घेतला जातो.मग महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांना मोफत पार्किंगची सुविधा का उपलब्ध करून दिली जात नाही.महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्कासह इतर शुल्क असे सर्व प्रकारचे शुल्क आकारले जाते.त्यानंतरही विद्यार्थ्यांनी पार्किंगसाठी वेगळे शुल्क का द्यावे? त्यामुळेच विद्यापीठाने व महापालिकेने सर्व महाविद्यालयांना पार्किंग मोफत करण्याचे आदेश द्यावेत.- ॠषी परदेशी, अध्यक्ष,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,पुणे 
—————————-
शुल्क नियंत्रण समितीकडून महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून पार्किंग शुल्कासंबधीचे स्वतंत्रपणे शुल्क जमा करण्याची मान्यता मिळत नाही ; तोपर्यंत महाविद्यालयांंना पार्किंग शुल्क घेण्याचा अधिकार नाही.त्यामुळे विद्यापीठाने सुमारे पाचवर्षांपूर्वी नियमबाह्य पार्किंग शुल्क आकारणी करण्याबाबत काढलेले तातडीने रद्द करावे,तसेच सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी.अन्यथा महाविद्यालय तसेच विद्यापीठ प्रशासना विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आक्रमक भुमिका घेतली जाईल. 
– कल्पेश यादव, मनविसे, शहराध्यक्ष, पुणे 
………
एनएसयुआयतर्फे फर्ग्युसनसह सर्व महाविद्यालयातील पार्किंग शुल्क बंद करावी,या मागणीसाठी मागील वर्षी आंदोलन केले होते.महाविद्यालयात प्रवेशासाठी येणा-या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पार्किंग शुल्काच्या नावाखाली वसूली केली जाते.परंतु,महाविद्यालयांकडून ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी दरवर्षी पार्किंगचे कंत्राट काढले जाते.परंतु,त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या खिशाला बसत आहे.त्यामुळे पालिका व विद्यापीठाने एकत्रितपणे महाविद्यालयातील पार्किंग शुल्क रद्द करावे.अन्यथा एनएसयुआयतर्फे आंदोलन केले जाईल.
– अक्षय जैन, अध्यक्ष ,एनएसयुआय,पुणेपार्किंग शुल्काबाबत विद्यापीठाकडूनही ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत.महाविद्यालयात पार्किंगसाठी शेड उभारण्यात आले नाहीत.तसेच पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले नाहीत.त्यातत स्वत:च्या जबाबदारीवर दुचाकी व चार चाकी वाहन पार्किंगमध्ये सोडून जावे,असा उल्लेख पार्किंगच्या पावतीवर असतो.त्यामुळे विद्यार्थ्यांनी पार्किंग शुल्क का द्यावे,असा प्रश्न उपस्थित होतो. कोणतीही सुविधा न देता पार्किंग शुल्क आकारणे म्हणजे एकप्रकारे खंडणी मागितल्या सारखेचे आहे.त्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर गुन्हे का दाखल करू नये? विद्यार्थ्यांना प्रवेश देताना महाविद्यालयांकडून इतर शुल्काच्या नावाखाली मोठे शुल्क वसूल केले जाते.त्यामुळे महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावीत.
– किरण साळी, शिवसेना,उपशहर प्रमुख