Home शहरे अहमदनगर शालेय क्रीडा स्पर्धांवर शिक्षकांचा बहिष्कार : जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

शालेय क्रीडा स्पर्धांवर शिक्षकांचा बहिष्कार : जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

0

अहमदनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे (निंबाळकर) यांनी क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा संघटनांना विचारात न घेता मनमानी कारभार चालवला आहे, असा आरोप करीत त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे करण्यात आली़ तसेच शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही महासंघाने दिला़
आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनाही निवेदन देऊन यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब शिंदे, प्रा. सुनील जाधव, भाऊसाहेब रोहोकले, महेंद्र हिंगे, संजय भुसारी, शिरीष टेकाडे, रमाकांत दरेकर, बापू होळकर, एस. एस. नरवडे आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांचे क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांशी वागणे व बोलणे अवमानकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांची बदली न झाल्यास ७ दिवसानंतर जिल्हा क्रीडा कार्यालयास कुलूप लावण्याचा तर ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा इशारा देण्यात आला. २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी जिल्हा क्रीडा अधिकारी, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राष्ट्रीय क्रीडा दिन काळा दिन पाळण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे़ स्पर्धा आयोजनासाठी प्रत्येक खेळासाठी किमान १० हजार रुपये निधीची तरतूद असताना जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी जाणिवपूर्वक ५० टक्के निधी कपात केला आहे.
जलतरण तलावाचा ठेका देण्यासंदर्भातही नावंदे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे निवेदनात म्हटले आहे़

नावंदे यांच्याकडून मनमानी वसुली
जिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश निधी व क्रीडा मंडळाकडून नावंदे यांनी निधी संकलन सुरू केले आहे़ या मनमानी वसुलीमुळे खेळांडूना आर्थिक भूर्दंड बसला असून, अनेक खेळाडू सरावापासून दूरावले आहे़ खेळाडूंसाठी उभारलेले वसतिगृह मागणी करूनही खुले करण्यात आले नाही. असे याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़