मुंबई, 15 : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.
फोर सेशन हॉटेल, वरळी येथे आयोजित मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट – 2022 प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार राहूल शेवाळे, श्रीकांत शिंदे तसेच एमएमआरडीएचे व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुंबई शहरात रोजगारासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर निश्चितच ताण वाढतो. त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वत:चे घर असावे हे स्वप्न असते. ज्यांना पक्के घर शक्य नसते ते झोपडपट्टीत राहतात. तेथे मुलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. या झोपडपट्टीधारकांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे. मुंबईची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता येथे आता घरे वाढविण्यासाठी जागा शिल्लक नाही. यामुळे शिवडी-न्हावाशेवा समुद्री मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईजवळ विकासासाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईत दर्जेदार रस्ते, पूल उभारण्यात येत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे चा विस्तार करण्यात येत आहे. वांद्रे वरळी सी-लिंक उभारण्यात आला असून त्याचाही विस्तार करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना जवळ आणणारा समृद्धी महामार्ग बांधण्यात आला असून त्याचा शुभारंभ देखील लवकरच करण्यात येणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मुंबईची सांडपाणी व्यवस्था सुरळीत करून शहरात पावसाचे पाणी साचून राहणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली असून भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या विकासासाठी तसेच हे शहर जगातील एक सर्वोत्तम शहर व्हावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
मुंबई शहराला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असून या ठिकाणी समुद्र जल पर्यटनाला खूप वाव आहे पर्यटनाचा विकास होण्यासाठी व रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होण्यासाठी मासेमारी करणाऱ्यांच्या वसाहती निर्माण करण्यात येतील, त्या ठिकाणी नागरी सुविधा पुरविण्यात येतील. मुंबईत पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे. येथे असलेले कोळी बांधव, त्यांची जीवनशैली हे मुंबईचे वैभव आहे. ते इतरांना जवळून अनुभवता यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.
000000