शाश्वत शेतीच्या योजनांमधून जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल-पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे – महासंवाद

शाश्वत शेतीच्या योजनांमधून जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल-पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे – महासंवाद
- Advertisement -

शाश्वत शेतीच्या योजनांमधून जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल-पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे – महासंवाद

नंदुरबार, दिनांक २६ जानेवारी, २०२५ (जिमाका) :- विविध कृषि योजनांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ  माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

ते आज पोलीस कवायत मैदानावर ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी खासदार ॲड गोवाल पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमूदिनी गावित, डॉ. सुप्रिया गावित, भरत गावीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव (ससप्र), सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, तहसिलदार डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे,  विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहा सराफ, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व  विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. कोकाटे म्हणाले, जिल्ह्याला कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सुधारणा करण्यावर भर दिला आहे. कार्यालयीन संकेतस्थळे अद्ययावत करून, माहिती अधिकारासाठी डिजिटल साधने वापरण्यावर भर आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण आणि सेवा हमी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांना वेळेत सेवा मिळेल.  स्वच्छता मोहीम अंतर्गत कार्यालयांमध्ये स्वच्छता, जुन्या वाहनांचे निर्लेखन व फाईल डिजिटायझेशन करण्यात येत आहे. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन, त्यांचे तक्रारींचे निराकरण, आणि उद्योगांना अनुकूल वातावरण निर्मितीला प्राधान्य आहे. अंगणवाड्या, शाळा, आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन स्थानिक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वाढवणे आणि नंदुरबार जिल्ह्याला आदर्श प्रशासकीय मॉडेल बनवणे हा आमचा उद्देश आहे. आपण, या १०० दिवसांच्या आराखड्याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक ९३८ मिलीमीटर (१२० टक्के) पडला आहे. खरीपानंतर रब्बी हंगामातील पेरणी १०० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. रोजगार व शेती सुधारण्यासाठी मनरेगा, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना तसेच सूक्ष्म सिंचन, वनराई बंधारे व शेततळ्यांच्या उपक्रमांतून शाश्वत शेतीसाठी योगदान दिले जात आहे. शासनाच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती सुरू असून, नागरी सुविधा केंद्रांच्या मदतीने ही प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने राबवली जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेला हा ओळख क्रमांक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मिळवावा.  आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत शेतीपूरक व्यवसायांना चालना दिली जात आहे. महिला बचत गटांना शेळ्या-बोकड पुरवठा व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी शेळीपालनाचा लाभ दिला जात आहे. महिलांचे सक्षमीकरण, पॉवर विडर यंत्रे, बिगर यांत्रिकी बोटी, मत्स्यजाळे, व जंगली जनावरे पळवणारी यंत्रे या सुविधांद्वारे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनांचा उद्देश आदिवासी समाजाला स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले, नवापूर तालुक्यातील श्री. योहान अरविंद गावीत यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत पिंजऱ्यातील मत्स्यव्यवसायात मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या यशाची दखल घेऊन त्यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील परेड व महामहिम राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. तसेच जिल्ह्यात या वर्षी आठवी आर्थिक गणना राबवून घरोघरी भेट देत व्यवसाय व उद्योगांची माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ८० व्या फेरीत “कुटुंबाचा सामाजिक उपभोग: आरोग्य” या विषयावर सर्वेक्षण जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार सिडींग पूर्ण झाले असून, जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच ९५ टक्के रेशन कार्डांचे मोबाईल सिडींग पूर्ण झाले आहे.

ते पुढे बोलतांना म्हणाले, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्याने ३४२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असून, पुरुष नसबंदीमध्ये महाराष्ट्रात पहिले स्थान मिळवले आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत सोनोग्राफी, सिजेरियन सुविधा, तसेच नवापूर येथे ट्रामा केअर व डायलिसिस युनिट सुरू झाले आहेत. नंदुरबारच्या महिला रुग्णालयात राज्यातील पहिले मोफत आय.व्ही.एफ. क्लिनिक सुरू झाले असून, ७६ जोडप्यांची तपासणी झाली आहे. या उपक्रमांमुळे “छोटे कुटुंब, सुखी कुटुंब” संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे. तसेच सिकलसेल निर्मूलन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ० ते ४० वयोगटातील ८ लाख नागरिकांची तपासणी मोहिम आजपासून सुरू होणार आहे. आतापर्यंत ३ लाख ९० हजार तपासण्या पूर्ण झाल्या असून १०० रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. लवकरच सर्व रुग्णांना अपंग प्रमाणपत्र व मोफत रक्तसुविधा कार्ड दिले जाईल. नागरिकांनी या तपासणी मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यांचा झाला सन्मान

ध्वजनिधी संकलनात १०० टक्के इष्टांक वसूल केल्याबद्दल स्मृतिचिन्ह.

  • जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी.

रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे वर्ष २०२४ या वर्षी ५ हजार पेक्षा जास्त  रक्त पिशव्या संकलनाचा नवीन उच्चांक झाला. त्यानिमित्त प्रतिनिधीक स्वरूपात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकारी-कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

  • महेश कुंवर आयसीटीसी समुपदेशक,
  • कपील पवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • जयेश सोनवणे रक्तपेढील वैज्ञानिक अधिकारी,
  • डॉ. रमा वाडीकर रक्तसंक्रमण अधिकारी.

केंद्र शासनाच्या ॲग्री स्ट्रॅक या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रंमाक प्रमाणपत्र/सन्मान पत्र यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात वितरीत करण्यात आले.

  • दिपक मोहन जोशी, खोंडामळी
  • चंद्रशेखर रावसाहेब पाटील, खोंडामळी.
  • विजयाबाई सुरेश पाटील, खोंडामळी.
  • चितांमण स्त्रुजन भोई, कोपर्ली.
  • प्रल्हाद भाईदास शिरसाठ, कोपर्ली.
  • अशोक भिका पवार, कोपर्ली.
  • कौस्तुभ कांतीलाल पटेल, बांभळोद.
  • अनिल नाना पाटील, बाभंळोद.
  • हसरत शांताराम जाधव, बाभंळोद.
  • प्रमोद नतेश्वर पाटील, सातुर्खे.
  • अंबिकाबाई नतेश्वर पाटील, सातुर्खे.
  • दिलीप भिमसिंग गिरासे, अमळथे.
  • देवचंद सुका कोळी, अमळथे.

जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२४-२५ निधीतून खरेदी केलेल्या नवीन १३ वाहनांचे लोकार्पन पालकमंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, एस. ए. मिशन हायस्कुल, अँग्लो उर्दू हायस्कूल व नवोद्यय विद्यालय, श्रावणी या विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी राष्ट्रभतीपर गीतावर योगासन, मल्लखांब व समूह नृत्यू सादर केले.

0000

- Advertisement -