Home बातम्या शासकीय कापूस खरेदीला मुहूर्त मिळेना, शेतकरी अडचणीत

शासकीय कापूस खरेदीला मुहूर्त मिळेना, शेतकरी अडचणीत

0

यवतमाळ : शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून समजल्या जाणारा कापूस आता निघू लागला आहे. परंतु अद्याप शासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

दर वर्षी दोन ऑक्टोबरला शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ होत असतो. याच दिवशी कपाशीचा दरही जाहीर होतो. परंतु या वर्षी विधानसभा निवडणुकी आल्यामुळे असे काहीही झाले नाही. मागील एक महिना पूर्णपणे निवडणूक प्रक्रियेत गेला. असे असले तरी मात्र कपाशी पिकाचा कालावधी महत्त्वपूर्ण असतो. शेतातील कापूस आता वेचणीला सुरुवात झाली आहे. अशातच अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण, कापूस फुटण्याचा हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशावेळी पाऊस आल्यानंतर ओला झालेला कापूस कवडीमोल भावाने व्यापारी विकत घेतात. त्यातही शासकीय कापूस खरेदी केंद्राला मुहूर्त न मिळाल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस खाजगी व्यापाऱ्याकडे विकावा लागत आहे. अशावेळी शासनाने ठरविलेल्या निर्धारित दरांपेक्षा कितीतरी कमी भावाने हा कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कापूस निघतो आहे. त्यांना आपली उधारी उसनवारी देणे आणि सणा करीता पैशाची गरज असल्याने शेतकरी आपला कापूस खाजगीत विकू लागला आहे.