Home अश्रेणीबद्ध शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा

शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा

0

खामगाव : आरोग्य यंत्रणेकडून लाखो रुपयांची औषधे पुरवली जात असतांना जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी सांगितल्या जाते तर औषधांविना रुग्णांना वेळेवर उपचार सुद्धा मिळत नसल्याचेही वास्तव आहे.
अनेकदा औषधाअभावी रुग्णांचे डॉक्टरसोबत वाद होत आहेत. गत वर्षी वैद्यकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा बळी भोनगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरज जमादार हे ठरले होते. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणा सुधारली नसल्याचे दिसून येते. राज्यशासनाच्या बजेटमध्ये आरोग्य विभागाच्या खर्चावर तरतुद केली जाते. जागतिक आरोग्य संघटना (डब्लू.एच.ओ) मार्फत सुद्धा कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र शासनाला मिळत असतो. असे असतांनाही दवाखान्यात औषधांचा तुटवडा असणे गंभिर बाब आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व सामान्य रुग्णालय वगळता ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १४ ग्रामिण रुग्णालय जिल्ह्यात आहेत. औषधांअभावी रुग्णांचा जीव धोक्यात असणे गंभिर बाब आहे. प्रत्येक रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या देखरेखीत रुग्ण कल्याण समिती कार्यरत असते. रुग्णालयात भोंगळ कारभार सुरु असतांना रुग्ण कल्याण समिती करतेय तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मलकापूर, शेगाव व खामगाव येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स जाणिवपूर्वक औषध उपलब्ध नसल्याचे कारण सांगून बाहेरून औषध आणायला सांगतात. सध्या सर्वत्र डेंग्यूसह मलेरिया यासारख्या आजाराने रुग्ण त्रस्त झाले आहेत. प्रत्येक ग्रामिण रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसत आहे. शासकीय रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने काही रुग्ण कंटाळून खासगी रुग्णालयाचा आधार घेत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रस्तरावर औषधसाठा उपलब्ध आहे. दोन दिवसापूर्वीच काही ठिकाणी भेट देवून चौकशी केली आहे.
– डॉ. बाळकृष्ण कांबळे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.

उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामिण रुग्णालयस्तरावर बाहेरून कुणी औषध लिहून देत असेल तर ते चुकीचे आहे. औषध साठा सर्वत्र उपलब्ध आहे.
– प्रेमचंद पंडीत,
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा