“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत” – अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे

“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत” – अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे
- Advertisement -


नंदुरबार, दिनांक १२ जून २०२६ (जिमाका): “शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज नंदुरबार तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, आरोग्य संस्था आणि महसूल यंत्रणांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान केले. शासनाच्या सेवा व योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत का, याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान नागरिकाभिमुख प्रशासन, सेवा वितरणातील पारदर्शकता, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर त्यांनी विशेष भर दिला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, प्रांताधिकारी उषाराणी देवगुणे, नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

दौऱ्याची सुरुवात नांदरखेडा येथील आरोग्य उपकेंद्राच्या भेटीने झाली. येथे आरोग्य सेवांची पाहणी करताना गरोदर मातांचे लसीकरण, सिकलसेल रुग्णांच्या नोंदी आणि आरोग्यविषयक अभिलेखांची तपासणी करण्यात आली. सर्व नोंदी अद्ययावत व व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. उच्च जोखीम (हाय रिस्क) असलेल्या गरोदर महिलांचे नियमित ट्रॅकिंग करून त्यांना वेळेवर तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश श्री. खारगे यांनी दिले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी समन्वय साधून अशा महिलांसाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी सांगितले.

 

आष्टे येथे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधींनी विविध विकासकामांबाबत मागण्या मांडल्या. यावेळी महसूल प्रशासन हे लोकाभिमुख असून नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि विकासकामांना गती देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे श्री. खारगे यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर आष्टे येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देऊन महसुली अभिलेख, शासकीय जमिनींच्या नोंदी तसेच त्यांवरील अतिक्रमणांची माहिती घेण्यात आली. सर्व दस्तावेज, अभिलेख आणि नोंदी व्यवस्थित व अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना विविध दाखले वेळेत मिळावेत यासाठी दाखले देण्याचे तसेच प्रतिज्ञापत्र मान्य करण्याचे अधिकार मंडळ अधिकारी स्तरावर देण्याबाबतची मागणी यावेळी करण्यात आली. सध्या हे अधिकार तहसीलदार स्तरावर असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यामुळे नागरिकांना अधिक जलद सेवा मिळण्याच्या दृष्टीने या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यानंतर मंडळ अधिकारी कार्यालय, आष्टे येथे भेट देऊन क्षेत्रीय महसूल कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अभिलेख व्यवस्थापन, नोंदी अद्ययावत ठेवणे आणि नागरिकांच्या प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. दौऱ्यादरम्यान वाघाळे येथे भेट देऊन आपली अभ्यासिका प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत कामांमध्ये आवश्यक गती राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

 

यानंतर नंदुरबार येथे तहसील कार्यालयाला भेट देण्यात आली. येथे टपाल व्यवस्थेची माहिती घेऊन कार्यालयीन पत्रव्यवहार, प्रकरणांची हाताळणी आणि निपटाऱ्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. तसेच गौण खनिजाशी संबंधित कामकाज, नियंत्रण यंत्रणा आणि अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेतील काही लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष दूरध्वनीवरून संवाद साधण्यात आला. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत आहे का, याची खातरजमा करण्यात आली. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हीच प्रशासनाच्या कामकाजाची खरी कसोटी असल्याचे श्री. खारगे यांनी यावेळी नमूद केले. त्यानंतर सेतू सुविधा केंद्र, नंदुरबार येथे भेट देऊन नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांची पाहणी करण्यात आली. दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर सेवांचा निपटारा वेळेत होत आहे का, याची माहिती घेऊन सेवा वितरण अधिक गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दुय्यम निबंधक कार्यालय, नंदुरबार येथे भेट देऊन दस्त नोंदणी, दस्तऐवज व्यवस्थापन आणि नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे भेट देऊन विविध महसुली प्रकरणे, प्रलंबित कामे आणि प्रशासनिक कार्यपद्धतीची माहिती घेण्यात आली. याशिवाय उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, नंदुरबार येथे भेट देऊन जमीन अभिलेखांचे संगणकीकरण, नकाशे, मोजणी प्रकरणे आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. भूमी अभिलेखाशी संबंधित प्रकरणे पारदर्शकपणे आणि वेळेत निकाली काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दिवसभराच्या दौऱ्यात आरोग्य, महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी, सेतू सेवा, गौण खनिज आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी करून श्री. खारगे यांनी नागरिककेंद्रित प्रशासन, उत्तरदायित्व आणि सेवा वितरणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला. शासनाच्या सेवा आणि योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

0000000000

 



Source link

- Advertisement -