पुणे, दि. ७ : जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमात महिला, युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या दालनांमध्ये आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डोळ्यांची तपासणी, मोफत आयुष्यमान भारत कार्ड विशेष मोहीम, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, समाजकल्याण विभागामार्फत शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना, यशवंत निवास घरकुल योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान आदी योजनांची माहिती देण्यात आली.
हिरकणी कक्षाद्वारे स्तनदा मातांना सुविधा
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आलेल्या स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. हिरकणी कक्षात आलेल्या मातांना स्तनपानाचे फायदे सांगण्यात आले. तसेच अंगणवाडीतून कमी वजनाच्या बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराविषयी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला आलेल्या श्रीमती सविता पोपट शेंडगे यांनी स्टॉलवर बरीच माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यांनी कामगार विभागाच्यावतीने नोंदणी केल्यानंतर टीफिन, पाणी बाटली, चटई, टॉर्च, मच्छरदाणी, बूट, मास्क, सेफ्टी हेल्मेट, हॅण्डग्लोज, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, असा सुरक्षा संच असलेले कीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
गुळुंचे येथून आलेल्या प्रियांका संतोष पाटोळे म्हणाल्या की, शासनाने चांगला उपक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाला आल्यामुळे बऱ्याच योजनांची माहिती मिळाली व मला पाहिजे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत योजनेची माहिती व आवश्यक अर्ज मिळाला.
पारगाव मेमाणे येथील स्वप्नील अशोक गायकवाड यांनी हा कार्यक्रम जास्त कालावधीचा घ्यावा व असे कार्यक्रम गावोगावी व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जेजुरीच्या नितीन राऊत यांनी शासनाला धन्यवाद देताना ‘खूप भारी उपक्रम आहे‘, अशी प्रतिक्रिया दिली. तर माधुरी जितेंद्र मोरे यांनी बऱ्याच योजनांची माहिती व आवश्यक अर्ज एकाच ठिकाणी मिळाल्याचे सांगून हा उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले.
000