‘शासन आपल्या दारी’ : नागपूरसाठी २० लाखांचे उद्दिष्ट – महासंवाद

‘शासन आपल्या दारी’ : नागपूरसाठी २० लाखांचे उद्दिष्ट – महासंवाद
- Advertisement -

‘शासन आपल्या दारी’, या अभियानातून लोकोपयोगी योजनांचा लाभ थेट जनतेच्या घरात पोहोचावा, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मोहिमेला नागपूर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पुढे आले आहे. स्वतः उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा पिंजून काढणे सुरू केले असून नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला 20 लाख लाभार्थ्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे.

            राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नागपूर जिल्ह्यात कार्यक्रम घ्यायचा असेल तर 20 लाख लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचायला हवे, अशी साद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाला घातली आहे. त्यामुळे प्रशासन गतीने कामाला लागले असून लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जावा, यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर 2 दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे उद्दिष्ट या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाच्या सुरुवातीलाच निश्चित केले होते. त्यावेळी मोजक्या कालावधीसाठी हे अभियान निश्चित करण्यात झाले होते.

            कालावधी वाढविल्यानंतर जिल्ह्यात या अभियानाची बांधणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाची पायाभरणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये केली आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा, उमरेड, काटोल, नरखेड, रामटेक, मौदा या सहा उपविभागात बैठकी घेऊन जिल्हा पिंजून काढला. त्यामुळे 75 हजार लाभार्थी उद्दीष्ट जून महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण झाले आहे. तर नागपूर महानगरातील विधानसभानिहाय लाभ पोहोचविण्यासाठी आयोजन सुरू आहे. नुकताच मध्य नागपुरातील मेळावा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. अन्य ठिकाणच्या आयोजनासाठी नागपूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बारकाईने नियोजन सुरू आहे.

            तथापि, या योजनेतून शाश्वत विकासाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढावी, कायमस्वरूपी रोजगार, घरे, व्यवसाय, नोकरी, रस्ते, पाण्याचे स्त्रोत, सौर ऊर्जेची उपलब्धता, विजेचे कनेक्शन, घरांचे पट्टे, कृषी योजनेतून दीर्घकाळासाठी कामी पडणाऱ्या यंत्रसामुग्रीचे आरोग्य यंत्रणेचा मोफत लाभ, अतिवृष्टी नुकसान भरपाई, जलयुक्त शिवार, अमृत सरोवर, पीएमकिसान, जलजीवन अभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, माझी वसुंधरा अभियान, पांदन रस्ता, रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थ सहाय्य योजना, गाव तिथे स्मशानभूमी अशा शेकडो कायमस्वरूपी उपयोगी येणाऱ्या योजनांचा लाभ देण्याकडे शासन प्रयत्नशील आहे. काही समस्या या माध्यमातून कायमस्वरूपी सुटाव्यात हा देखील या अभियानाचा उद्देश आहे.

सामाजिक न्याय विभागाचा वेगळा प्रयोग

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकारात महाराष्ट्रामध्ये प्रथमच केवळ अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय घटकाच्या शेकडो लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत लाभ देण्याच्या कार्यक्रम जिल्हयात आयोजित करण्यात आला. ‘शासन आपल्या दारी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

                  या विभागांतर्गत असणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, धनगर घटकांच्या अनेक योजनांच्या माध्यमातून शेकडो लाभार्थ्यांना हा लाभ प्रत्यक्ष दिला. यावेळी सफाई कामगारांच्या वारसदारांना नुकसान भरपाईचे धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच मार्जिन मनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, रमाई आवास योजना, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वितरण, दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण, यशवंतराव मुक्त वसाहत योजना, आश्रमशाळेच्या विद्याथ्र्याना टॅब वितरण, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावांना विकास कामांसाठी प्रत्येकी 20 लक्ष अनुदान, कन्यादान योजना, अनुसूचित जाती उपयोजना, निवासी शाळा व प्राविण्याप्राप्त विद्यार्थी तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव, आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत जोडप्यांना प्रोत्साहन रकमेचे वितरण , महात्मा फुले मागासवर्ग मंडळातर्फे व्यावसायिकांना अर्थसहाय्य, स्वाधार योजनेचा लाभ, दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्रांचे, युडीआयडी वाटप आदी योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

दिव्यांगांसाठी विशेष अभियान

            अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती यांच्यानंतर आता दिव्यांगांसाठी ‘शासन आपल्या दारी’ विशेष अभियान राबविण्यात येणार आहे दिव्यांगांच्या योजना वैश्विक आधार कार्ड प्रमाणपत्र एकाच स्थळी देण्यासाठी जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाचा प्रारंभ जिल्ह्यामध्ये 25 सप्टेंबर पासून होणार आहे. जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून सामाजिक न्याय विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

25 लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

            नागपूर शहर, जिल्हा मिळून एकत्रित 25 लाख लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्याचे काम शासकीय यंत्रणेने करावे, असे उद्दिष्ट उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर राज्यव्यापी कार्यक्रम जिल्ह्यात घेण्यात येईल, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील अशी सूचना प्रशासनाला केली आहे.

            जिल्हा प्रशासनाने या उद्दिष्टाकडे दमदार प्रवास सुरू केला आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये यापूर्वीच हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. येत्या काही दिवसात या अभियाना अंतर्गत गाव पातळीवर देखील शिबिर आयोजित करण्यात येतील. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीच वस्तूपाठ घालून दिल्यामुळे प्रशासन गतिशील झाले आहे.

प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर

- Advertisement -