
Ø प्रधानमंत्री आवास योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करीत नोंदणीला गती द्या
Ø सरपंच व ग्रामसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
नागपूर, दि. १६ : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करीत योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला अधिक गती देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आज रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० ही सर्वसामान्यांसाठी योजना शासनाने आणली आहे. त्यामुळे या योजनेची नोंदणी करताना येणा-या अडचणी दूर करण्यात याव्यात. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशासन, सरपंच व ग्रामसेवकांच्या सहकार्याने नाव नोंदणीस गती देण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले.
वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल म्हणाले की, सर्वांसाठी घरे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवायची आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जिल्ह्यात शंभर टक्के घरकुलाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. सर्वसामान्य, दुर्गम माणसाच्या अडचणी दूर करायच्या आहेत. विविध योजना नागरिकांपर्यंत सहजतेने पोहोचण्याची गरज असल्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश सांगितला.
उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतींचा गौरव
जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींचा गौरव पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यात मौदा तालुक्यातील वाकेश्वर, कोदामेंढी, सिरसोली,, कामठी तालुक्यातील महालगाव, उमरी, उमरेड तालुक्यातील सुरगाव कुही तालुक्यातील तितुर, सावनेर तालुक्यातील पिपळा डा.ब. तसेच पारशिवनी तालुक्यातील उमरी पाली या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांना पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
०००