हायलाइट्स:
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
- शाहूंच्या विचारांवरच महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याचा दावा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करताना अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचं स्मरण केलं आहे. ‘शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचे आदर्श राज्य निर्माण केले. सक्तीचे शिक्षण, दुर्बल घटकांना आरक्षण, पायाभूत सुविधांची निर्मिती, क्रांतिकारी सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय व विकासाची संधी दिली. समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची दारे खुली केली. शाळा, वसतिगृहे बांधली. शेतकऱ्यांसाठी धरणे बांधली. बाजारपेठा निर्माण केल्या. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजे, क्रांतिकारी विचारांचे थोर समाजसुधारक होतं, असं अजित पवार म्हणाले.
वाचा: आदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा द्या; हायकोर्टात याचिका
‘शाहू महाराजांनी महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत करून प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरांना विरोध करून बंदी घातली. आंतरजातीय विवाहासाठी कायदा केला. त्याच विचारांवर महाविकास आघाडीचे सरकार कार्य करत आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील शाहू महाराजांना आदरांजली वाहिली आहे. ‘छत्रपती शाहू महाराजांसारख्या लोकल्याणकारी राजाला अल्पायुष्य लाभले हे खरे तर आपलेच दुर्दैव होते. मात्र आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत महाराजांनी शिवरायांच्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी खूप संघर्ष केला व त्यामध्ये ते यशस्वीदेखील झाले,’ असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे.
वाचा: ‘संभाजीराजेंना पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ का दिली नाही?’