मुंबई, दि. 10 : आज कॅपिटेशन फी मुळे शिक्षणाचे व्यावसायीकरण होत आहे. परंतु शिक्षण हा व्यवसाय नसून ते एक व्रत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माता, पिता, गुरु तसेच राष्ट्राप्रती कर्त्यव्याची जाणीव दिली जावी व चारित्र्यसंपन्न नागरिक घडवले जावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.
आपल्या स्थापनेची शताब्दी साजरी करीत असणाऱ्या पार्ले टिळक विद्यालय संस्थेने देशासाठी उत्तम वैज्ञानिक, उत्तम लष्करी अधिकारी, उत्तम नेते व अभिनेते घडवताना स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत उत्तम नागरिक घडवावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल विलेपार्ले मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा शताब्दी सांगता समारोह संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू, संचालिका व माजी कुलगुरु डॉ स्नेहलता देशमुख व संस्थेचे सचिव दिलीप पेठे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षण हे मनुष्याला केवळ रोजगारक्षम बनविणारे नसावे तर ते मूल्याधिष्ठित असावे असे सांगताना शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे दिन दुःखी लोकांच्या जीवनातील अज्ञान अंधकार दूर झाला पाहिजे व नव्या पिढीला उज्वल भविष्याची वाट दाखवली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
शाश्वत जीवन कौशल्ये दिली जावी : डॉ माशेलकर
रोजगारासाठी लागणारी कौशल्ये नित्य नव्याने बदलत आहेत. आजची कौशल्य उद्या निरंक ठरत आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाश्वत जीवन कौशल्ये दिली जावी अशी अपेक्षा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना नित्याच्या समस्यांचे निराकरण, गहन चिंतनशिलता, सर्जनशीलता, अनुकंपा व गट कौशल्ये दिली जावी असे डॉ माशेलकर यांनी सांगितले.
पार्ले टिळक विद्यालयाने पु. ल. देशपांडे, हवाईदल प्रमुख ए एम नाईक, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांसारखे विद्यार्थी घडवले असे सांगून संस्थेने देशाला सर्वांगीण विकास करणारे नेतृत्व दिल्याबद्दल माशेलकर यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
सन १९२१ साली ४ विद्यार्थ्यांसह स्थापना झालेली पार्ले टिळक विद्यालय ही संस्था आज ५ शाळा, ३ महाविद्यालये, एक व्यवस्थापन संस्था व एक क्रीडा अकादमी चालवित असल्याची माहिती पार्ले टिळक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू यांनी यावेळी दिली. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या शताब्दी गौरव ग्रंथाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. उपाध्यक्ष विनय जोग यांनी आभारप्रदर्शन केले.
Maharashtra Governor presides over Centenary Celebrations of Parle Tilak Vidyalaya Association
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Concluding function of the Centenary Celebrations of the Parle Tilak Vidyalaya Association at Vile Parle in Mumbai on Thursday (9 June).
Well-known science leader Dr. Raghunath Mashelkar, President of the Association Anil Ganu, former vice chancellor of University of Mumbai Dr Snehlata Deshmukh and Secretary Dilip Pethe were present.
The Governor released the Centenary Commemorative volume of the Association on the occasion.
0000