शिक्षण शुल्क माफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील प्रवेशात मुलींची लक्षणीय वाढ – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

शिक्षण शुल्क माफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील प्रवेशात मुलींची लक्षणीय वाढ – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
- Advertisement -

शिक्षण शुल्क माफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील प्रवेशात मुलींची लक्षणीय वाढ – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

मुंबई, दि. १७ : राज्यातील महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षणासाठी मुलींचे शिक्षण शुल्क माफ केल्यामुळे  सकारात्मक बदल घडून येत असून मुलींच्या प्रवेशात लक्षणीय वाढ होत आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे २०२३–२४ आणि २०२४–२५ या वर्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारांचा वितरण समारंभ एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सर सिताराम तथा लेडी शांताबाई पारकर दीक्षान्त सभागृहात पार पडला. कार्यक्रमात शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेश देवळाणकर, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदेडकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे उपस्थित होते.

राज्यातील नागपूर, अमरावती, उत्तर महाराष्ट्र, कोकण आदी विभागांतून प्रत्येकी एक अशा एकूण १२ पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती देत, पुढील काळात ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले

मंत्री पाटील म्हणाले की, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क दोन वर्षांपासून पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. यापूर्वी वार्षिक आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींसाठी ५० टक्के शुल्क शासन देत होते. मात्र, आता ती १०० टक्के करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पहिल्या वर्षी सुमारे २८ हजार आणि यावर्षी तब्बल ५७ हजार मुलींनी व्यावसायिक शिक्षणात प्रवेश घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थिनींच्या राहणीमानाचा खर्च भागविण्यासाठी ‘निर्वाह भत्ता’ योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबईसारख्या महानगरात दरमहा सहा हजार, कोल्हापूरसारख्या शहरांत ५,१०० रुपये आणि तालुकास्तरावर २,८०० रुपये याप्रमाणे भत्ता दिला जात आहे. यामुळे वसतिगृह उपलब्ध नसल्यास विद्यार्थिनींना राहण्याची व जेवणाची सोय करणे सुलभ होत आहे.

पुण्यातील लवचिक वेळापत्रकाच्या रोजगार मॉडेलचा उल्लेख करतांना, १२ ते ५ या वेळेत अर्धवेळ नोकरी आणि १० हजार रुपयांपर्यंत मानधन देणारे प्रयोग महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांचा अधिक व्यापक स्तरावर विस्तार करण्याची गरज असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

पुरस्काराची रक्कम महत्त्वाची असली तरी त्यामागील सामाजिक मान्यता अधिक मोलाची असते हा पुरस्कार नियमितपणे व वाढत्या रकमेने देण्याचा प्रयत्न राहील, असे सांगून  मंत्री पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांचा कांस्य पुतळा देण्याची घोषणा करत, या पुतळ्यामुळे विद्यार्थिनींना सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी कार्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्त्रीशिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या योगदानाची विस्तृत माहिती मंत्री भुजबळ यांनी उपस्थितांना दिली. पुरस्कार म्हणजे थांबायचा टप्पा नसून अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे, असा संदेश देत त्यांनी महिलांच्या शिक्षणाचे देशाच्या प्रगतीतील महत्त्व अधोरेखित केले.

मंत्री भुजबळ म्हणाले की, पुण्याच्या भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करून, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्लेगच्या साथीच्या काळात रुग्णांची सेवा करताना त्यांनी प्राणाचे बलिदान दिल्याचे उदाहरण देत सेवाभावाचे महत्त्व मंत्री भुजबळ यांनी अधोरेखित केले. आजच्या काळात महिलांचे शिक्षण आणि सहभाग हा देशाच्या विकासाचा पाया आहे. जिथे महिला शिक्षित होऊन पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहतात, ते देश प्रगती करतात, असे नमूद करत, महिलांनी सर्व क्षेत्रात धाडसाने पुढे येण्याचे आणि पुरुषांनी त्यांना सर्व टप्प्यावर भक्कम साथ देण्याचे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले.

यावेळी पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र तसेच रोख पारितोषिक प्रदान करून सत्कार करण्यात आला. २०२३–२४ या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातून संगिता संजय बाविस्कर (छत्रपती संभाजीनगर), नाशिक विभागातून निवेदिता सुनील ताठे (जळगाव), पुणे विभागातून संगिता किरण राणे (कोल्हापूर), नागपूर विभागातून नंदा अशोक कोल्हटकर (नागपूर), अमरावती विभागातून निलिमा वसंतराव काळे (यवतमाळ) आणि कोकण विभागातून जयश्री परशुराम पाटील (नवी मुंबई) यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे सन २०२४–२५ या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातून सुनिता माणिकराव मुळे (हिंगोली), नाशिक विभागातून बेबीताई अशोक गायकवाड (अहिल्यानगर), पुणे विभागातून अनुराधा दीपक भोसले (कोल्हापूर), नागपूर विभागातून डॉ. किरण राधेश्याम मेश्राम (नागपूर) आणि कोकण विभागातून डॉ. अॅड. मिता संजय गंगावणे (नवी मुंबई) यांना गौरविण्यात आले.

०००

- Advertisement -