कोल्हापूर : कोल्हापूरसह शहारालगत असणाऱ्या ग्रामीण भागात वीजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाट आणि गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे कसबा बावडा ते शिरोली एमआयडीसी रस्त्यावरील शिये टोल नाक्याचे संपूर्ण छत कोसळले. त्यात एक चारचाकी, आठ दुचाकी मोटारींचे नुकसान झाले. तर एक पोलीस कर्मचाऱ्यासह 6 जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
बावड्यातील या टोल नाक्याचे शेड पूर्णपणे खराब झाले होते. ते केंव्हा कोसळेल याचा नेम नव्हता. तरीही महापालिकेने ही शेड उतरवून घेतली नव्हती. आज रात्री पावणे नऊच्या सुमारास जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे हा टोलनाका जमीनदोस्त झाला. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार चाकीचे व आठ मोटरसायकलचे नुकसान झाले. या टोल नाक्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तासाठी होते. तर एका पोलिसासह सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या मुसळधार जोरदार पावसाचा फटका शिये परिसराला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शिवाय शिये परिसरात असणाऱ्या अनेक घरांची पडझड देखील झाल्याचं वृत्त आहे.