हायलाइट्स:
- लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चित्रपट ‘हंगामा २’
- ‘हंगामा २’मधून शिल्पा शेट्टी १२ वर्षांनंतर करतेय बॉलिवूडमध्ये पुनरागमन
- ‘हंगामा २’चा ट्रेलर नुकताच झाला रिलीज, सोशल मीडियावर होतेय चर्चा
‘हंगामा २‘मध्ये दोन वेगवेगळ्या कुटुंबांची कथा दाखवण्यात आली आहे. एक तिवारी कुटुंब ज्यात सुंदर पत्नी आणि सर्वांचा तिरस्कार करणारा पती असतो. तर दुसरी असते कपूर फॅमिली, ज्यात एक रिटायर्ड कर्नल आणि त्यांची दोन मुलं राहत असतात. पण गोंधळ तेव्हा सुरू होतो. जेव्हा एक मुलगी तिवारींच्या घरी एक बाळ घेऊन येते आणि सांगते की, हे बाळ त्यांच्या मुलाचं आहे.
परेश रावल यांनी या चित्रपटात राधे श्याम तिवारी ही व्यक्तीरेखा साकारली आहे. तर त्यांची पत्नी अंजली तिवारीच्या भूमिकेत शिल्पा शेट्टी दिसणार आहे. मिजान जाफरीनं या चित्रपटात त्या मुलाची भूमिका साकारली आहे. ज्याचं बाळ असल्याचा दावा त्या मुलीनं केलेला असतो. या चित्रपटातून अभिनेत्री प्रणिता सुभाष बॉलिवूड डेब्यू करत आहे. याआधी तिनं काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय या चित्रपटात राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
अनेक वर्षं मोठ्या पडद्यापासून दूर असलेली शिल्पा शेट्टी या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. शिल्पा १२ वर्षांच्या प्रदिर्घ काळानंतर पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे. त्यामुळे ‘हंगामा २’ मध्ये धम्माल कॉमेडीसोबतच शिल्पाचं ग्लॅमरही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २३ जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होत आहे.