शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – रोहयो मंत्री भरत गोगावले

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – रोहयो मंत्री भरत गोगावले
- Advertisement -


रायगड-अलिबाग, दि. १२ जून (जिमाका) : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार दि. २७ जून २०२६ रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, सोहळ्याचे नियोजन सुयोग्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विविध तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती महाडच्या सभापती प्रेरणा सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे,  उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, विविध विभागांचे अधिकारी तसेच कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. गोगावले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा हा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी रायगडावर येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील कामे वेळेत पूर्ण करून सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे.

सोहळ्यादरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा सक्षम ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्ट्रेचर आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यावर भर दिला. सर्पदंशासारख्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने आवश्यक उपचार साहित्य आणि औषधे उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने विविध समित्यांची स्थापना केली असून आरोग्य, पाणीपुरवठा, परिवहन, विद्युत, खानपान, मंडप, स्वच्छता, शौचालय व्यवस्था, राजशिष्टाचार आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन सुरू आहे. शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून समितीनिहाय कामांचा नियमित आढावा घेतला जात आहे.

बैठकीत विविध समित्यांनी आतापर्यंत झालेल्या तयारीचा आढावा सादर केला. तसेच कोकणकडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात विविध सूचना मांडल्या.

 

 



Source link

- Advertisement -