शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Advertisement -

मुंबई, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. स्वराज्यावर अनेक संकटे आली, काही स्वकियांकडून तर काही परकियांकडून, पण महाराज कधीही झुकले नाहीत. त्यांचे शौर्य, व्यक्तिमत्व, रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात.

महाराजांचे वेगळेपण हे की, ते युगपुरुष होते. त्यांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार, रणनीती याचे आज आपल्यासमोर उदाहरण आहे. त्यांचे आज्ञापत्र वाचले तर शिवराय किती प्रजाहितदक्ष होते याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, समयसूचकता ही वैशिष्ट्ये आजच्या व्यवस्थापनशास्त्रालाही अभ्यासण्यासारखी आहेत.

शिवराय सर्वांचे होते. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी बांधलेल्या सेनेत अठरा पगड जातीचे लोक होते, जात-धर्म-भाषा यांच्या भिंती ओलांडून शिवरायांवर प्रेम करणारे लोक होते. शिवरायांच्या युद्ध नीतीमुळे भारतीय लष्कर त्यांना आज आपले दैवत मानते.

राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून आपण हा पराक्रमी इतिहास पुढील अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी जतन करण्याचे कामही हाती घेतले आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेवून आमचे सरकार काम करीत आहे आणि पुढेदेखील करणार आहे,अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

- Advertisement -