शिवसेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी, मुनगंटीवारांची सेनेवर टीका

- Advertisement -

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सेना-भाजपचा वाद चांगलाच पेटला आहे. फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेला सामना चांगलाच रंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील कलगीतुऱ्यामध्ये आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उडी घेतली आहे. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याची शिवसेनेने भूमिका घेतली होती. यावर बोलताना विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे शिवसेना-भाजप दरम्यान आणखीनच तणातणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, युती म्हणजे ‘एंगेजमेंट’ असते. महायुती केली तर महायुतीसोबतच राहायला हवे. कोणाला किती समर्थन आहे, हा प्रश्न नाही. जनतेने मतरुपी आशीर्वाद महायुतीला दिले आहेत. अशावेळी दुसऱ्यांबरोबर जाणे योग्य नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असेच म्हणता येईल, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी शिवसेनेचे नाव न घेता टीका केली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुधिर मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जसे त्यांच्याकडे पर्याय खुले आहेत. त्याप्रमाणे भाजपकडेही पर्याय खुले आहेत. युती केली असेल तर महायुतीसोबत राहायला हवे. जसे शिवसेनेकडे लोक येत आहेत. तसेच भाजपकडेही येत आहेत. त्यांचा निर्णय ही मोठी राजकीय घोडचूक ठरु शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, सत्तेत 50-50 टक्केचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यानंतर शिवसेनेतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. इतकेच नव्हे तर सत्ता समीकरणासाठी भाजप-शिवसेनेत होणारी बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हे माहिती दिली.

- Advertisement -