Home ताज्या बातम्या शिहू भागातील शेती गेली वाहून

शिहू भागातील शेती गेली वाहून

0

नागोठणे : सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील शिहू भागातील भातशेती वाहून गेली. शासनाने तातडीने शेतीचा पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिहू येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल आणि माजी सरपंच भास्कर म्हात्रे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. पावसाचा फटका शिहूसह चोळे, आटिवली, गांधे, मुंढाणी आणि बोरावाडी तसेच इतर आदिवासीवाड्यांमधील शेतकऱ्यांना बसला आहे.

मुसळधार पावसाने नाले पाण्याने भरून पाणी वेगाने वाहायला सुरुवात झाली व कापणी केलेली भातशेती, शेतातून वाहून गेली असल्याचे वसंत मोकल यांनी सांगितले. साधारणत: ५०० ते ६०० एकर भातशेतीला त्याचा फटका बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शासनाने सर्व गावांमधील शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

भातपीक धोक्यात

च्रेवदंडा : सोमवारी सायंकाळच्या पावसाने भातपीक पूर्णपणे धोक्यात आले असून अनेक शेते पाण्यांनी भरली आहेत; कापणी केलेले भातपीक हातातून गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच पावसाने दमदार हजेरी लावली आणि नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पाऊस सुरूच असल्याने शेतकरी तर शेतावर फिरकण्याच्या मन:स्थितीत नाही.