सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : यंत्रणांनी जिल्हा नियोजन, राज्य अर्थसंकल्प व केंद्र सरकारकडील योजनांचा निधी विहीत मुदतीत गुणवत्तापूर्ण कामावर खर्च होईल याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी. शेतकरी, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठी काम करावे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविताना शेतकऱ्यांना आवश्यक असणारी मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
मिरज विधानसभा क्षेत्रातील विकास कामाबाबत आढावा बैठक मिरज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, प्रांताधिकारी मिरज डॉ. समीर शिंगटे, तहसिलदार मिरज दगडू कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक संध्याराणी देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सविता यादव यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, समाज कल्याण, महानगरपालिका, शिक्षण यासह विविध विषयांचा आढावा या बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी यावर्षी पाऊस पाणी चांगले आहे, पेरण्या चांगल्या झाल्या आहेत, खते, औषधे यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना मानसिक पाठबळ देवून कृषी संबंधित विविध योजनांचा लाभ द्या. शेततळी, ठिबक सिंचन आदि योजनांसाठीचे शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित असल्यास ते एकत्रित करून प्रस्ताव तयार करावा त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महसूल संबंधी आढावा घेत असताना मिरज तालुक्यातील तलाठी, चावडी, मंडल अधिकाऱ्यांची कार्यालये, उपविभागीय अधिकारी व तहसिल यासाठी स्वतंत्र कार्यालयांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करावेत, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, रेशन कार्ड वितरण, महा-ई-सेवा केंद्राकडील अर्जांची प्रलंबितता, ऑनलाईन सातबारामधील त्रुटी यासाठी शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांना कोणत्याही पध्दतीचा त्रास होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याबाबत निर्देशित केले. तसेच ज्या ठिकाणी शेती, वाडी वस्ती साठी रस्ते, रस्त्यांची मागणी करण्यात आली आहे त्याच्या पूर्ततेसाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. आठवड्यातून ठरावीक वेळ यासाठी ठेवून कामे मार्गी लावावीत.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तडीपार संबंधातील प्रस्तांवावर निर्णय घेवून त्यांची तातडीने निर्गती करावी अशा सूचना देवून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पशुसंवर्धनबाबतचा आढावा घेत असताना लम्पी चर्मरोगाच्या प्रतिबंधासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या आजाराने जिल्ह्यात जनावरे दगावणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्या. पशुवैद्यकीय दवाखाने सुसज्ज असावेत यासाठी आवश्यक सामग्रीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने जनकल्याणांची विविध फंडामधून करण्यात येणारी कामे तातडीने सुरू करावीत. आरग येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, मिरज मधील पुतळ्यांचे सुशोभिकरण, कृष्णाघाट मधील विविध बांधकामे आदि कामे तातडीने पूर्ण करावीत. दलित वस्त्यांसंबंधित प्रस्तावित कामे प्रलंबित न राहता त्यांना तात्काळ मान्यता देण्यात येवून ती पूर्ण करावी. ही कामे करत असताना प्रस्तावित कामे दलित वस्तीमध्येच व्हावीत याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या मिरज येथील भाजीमंडईचे काम आराखड्यानुसार व विहीत मुदतीत पूर्ण करावे. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होवू नयेत यासाठी त्यावर कुंपण घालावे व मालकी हक्काबाबत फलक लावावेत. गुंठेवारी क्षेत्रातील बिगरशेतीचे कामे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत त्याचा निपटारा नियमानुसार तातडीने करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
मिरज तालुक्यातील ज्या शाळा मॉडेल स्कूल करावयाच्या आहेत त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पडझडीस आलेल्या शाळा खोल्यांचा सर्व्हे करावा व निर्लेखनाचा प्रस्ताव तयार करावा. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शौचालये आणि पिण्याचे स्वच्छ पाणी या सुविधा उपलब्ध असतीलच याची दक्षता घ्यावी. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार करून विहीत मुदतीत गावांना पाणीपुरवठा सुरळीत होईील याबाबत काटेकोर दक्षता घेण्याबाबत त्यांनी यावेळी निर्देशित केले.
०००००