नाशिक, दिनांक: 18 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा भूसंपादन तसेच नाशिक पाटबंधारे विभागाकडील नाले दुरुस्ती, पूररेषा नियंत्रण, ओझरखेड कालवा चारी दुरूस्ती, विस्तारीकरण व पुल बांधणी, पालखेड डावा कालव्यावर एस्केप गेट बसविणे इत्यादी कामे शेतकऱ्यांना प्राधान्य देवून वेळेत पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांसाठी शासकीय पातळीवर मान्यतेची आवश्यक आहे, त्या कामांबाबत कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यास शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, चांदवडचे प्रांताधिकारी सी.एस. देशमुख, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नाशिक लघु पाटबंधारे विभागाचे सचिन पाटील, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप तसेच जयदत्त होळकर, मोहन शेलार, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जलसंपदा विभागांतर्गत प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून समन्वयाने व नियोजनपुर्वक काम करणे आवश्यक आहे. तसेच ज्या भागात भूसंपादनाचा विषय येत असेल त्या ठिकाणी एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून दर निश्चित करण्यात यावा. ज्या ठिकाणी कामे चालु किंवा प्रलंबित आहेत अशा ठिकाणी प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी क्षेत्रिय भेट देवून तेथील प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत.
या कामांचा घेतला आढावा
दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा काजीसांगवी ता. चांदवड येथील भूसंपादन, नांदूरमध्यमेश्वर ते संवत्सर, खेडलेझुंगे, कानळद पूररेषा निश्चित करणे, रुई, देवगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद शिरवाडे या परिसरात नाल्यांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची दरवर्षी होणारी नुकसान टाळण्यासाठी करावयाची कार्यवाही, देवगाव, रुई, कोळगाव, कानळद (देवगाव) गोदावरी कालवा १५ नंबर व नाला ७ नंबर मोऱ्यापर्यंत खोदकाम करून चर काढणे (पावसाचे पाणी), गोदावरी डावा तट कालवा साखळी क्रमांक २०५०० ते २१३०० मीटर. मध्ये विशेष दुरुस्ती व अंतर्गत कालव्यास अस्तरीकरण करणे या कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळणेबाबत कामांचा प्रस्ताव तयार करून तो तात्काळ सादर करण्यात यावा, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी डावा कालवा २५ नंबर चारी जऊळके पासून मुखेड पर्यंत स्वतंत्र करावी, गोदावरी कालवा-चारी क्रमांक ३ मुखेड येथे पाणी मिळत नसल्याने दुरुस्ती करणे, पालखेड डावा कालव्यावर थेट विमोचक बसविणे तसेच ओझरखेड कालव्यातून खडक माळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी ४९ किलो मीटर मध्ये एस्केप गेट बसविणे या कामांचा प्रस्ताव तयार करून ही कामे लवकर सुरू करण्यात यावी. तसेच रयत शिक्षण संस्था विंचूर येथे पालखेड डावा कालवा भूमिगत करणेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, हे कामही लवकरच सुरू करण्यात येईल.
पुणेगाव दरसवाडी कालवा किलो मीटर १ ते २५ विस्तारीकरण आणि सदर कालव्यावरील वणी येथील बोगद्याच्या विस्तारीकरणाचे काम, पुणेगाव-दरसवाडी कालवा व दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे अपूर्ण काम यांत्रिकी विभागाकडून पूर्ण करणे, ओझरखेड कालवा दोन उन्हाळी आवर्तने देण्याबाबत. (खडकमाळेगाव), पालखेड डावा कालवा १११ कि.मी. मध्ये कालव्यावर सोनवणे वस्तीकडे जाण्यासाठी पूल बांधणे या कामांचा आढावा घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
0000000000