Home ताज्या बातम्या शेतकऱ्याच्या मुलानं बनवली इलेक्ट्रीक सायकल, ग्रामीण भागात ठरणार फायदेशीर

शेतकऱ्याच्या मुलानं बनवली इलेक्ट्रीक सायकल, ग्रामीण भागात ठरणार फायदेशीर

0

कोण म्हणतं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं शहरी मुलांपेक्षा कुठं कमी आहेत. आता हेच बघा ना, नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने चक्क इलेक्ट्रीक सायकल बनवली आहे. प्रवरा इंजिनिअरींग कॉलेजला दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणाचे नाव वैभव गाडेकर आहे. राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक गावचा वैभव दररोज पंधरा किमी प्रवास करून लोणी प्रवरानगर येथे कॉलेजला शिक्षण घेतो. दररोज जाण्यायेण्याचा खर्च कमी करावा यासाठी त्याने अफलातून आयडीया लढवलीय. त्याने चक्क आपल्या सायकललाच ई-सायकल बनवले आहे.

चार्जिंगची बॅटरी, मोटर याच्या सहाय्याने त्याने सायकल पँडल न मारता चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. ही सायकल साधारण पन्नासच्या वेगाने धावू शकते. एकाचवेळी तुम्ही सेल्फ रनिंग आणि पॅण्डलचाही उपयोग करू शकता. अगदी मोटरसायकलच्या बरोबरीने ती रस्त्यावरून धावत आहे. वैभव दररोज आपल्या सायकलवरून काहीही पैसे खर्च न करता कॉलेजला जातो.

ग्रामीण भागातील मुलांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकदा शाळा कॉलेजला जाता येत नाही किंवा साधनं उपलब्ध नसल्यानेही शिक्षण सोडावे लागते. अशांसाठी ही सायकल नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असलेल्या वैभवने ही सायकल बनवली आणि आता सेल्फ चार्जिंगची सुविधा देखील तो लवकरच बनवणार आहे. अशी परिपूर्ण ई-सायकल इतरांना बनवून देण्याचा त्याचा मानस आहे, असे वैभव गाडेकर याने सांगितले. आपल्या मुलाने जगावेगळे काहीतरी केल्याचा त्याचा आईलाही मोठा हेवा वाटतोय.