उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी। २७ मे : शेतरस्त्याच्या वादातून भूम तालुक्यातील देवळाली येथे धारदार शस्त्राने एकाच खून करण्यात आला आहे. मयत भूम पंचायत समितीचे सदस्य बाजीराव कल्याण तांबे असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत डझनभर लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बाजीराव कल्याण तांबे मंगळवारी २६ मे रोजी देवळाली ग्रामपंचायत कार्यालया समोरुन दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांचे भाऊबंद चंद्रकांत तांबे, सुर्यकांत तांबे, मधुकांत तांबे, रामनाथ तांबे, किरण तांबे व अन्य गावकरी अभिजीत शेटे, श्रीपती विधाते, प्रकाश गोरे, दिनेश गोरे, भागवत गोरे, चंद्रकांत शेटे या सर्वांनी संगनमत करुन बाजीराव तांबे यांना अडवून मारहाण केली. यावेळी सुर्यकांत, मधुकांत व रामनाथ यांच्या चिथावणीवरुन चंद्रकांत तांबे याने धारदार शस्त्र बाजीराव तांबे यांच्या पोटात खुपसून ठार केले. अंकुश कल्याण तांबे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अन्य अकरा फरार आहेत. भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.