-
शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी दिड कोटींचा निधी देणार
-
पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची क्षमता वाढविण्यात यावी
-
फिरत्या माती परीक्षण वाहनासाठीही एक कोटींची मदत
ठाणे, दि. 2 (जिमाका) – जिल्ह्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय शेतीबरोबरच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनक करावे. तसेच शेतीला पाणी मिळावे, यासाठी कृषि विभागाने पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात झाली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. यावेळी आमदार किसन कथोरे, आमदार गणपत पाटील, आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षी झालेल्या खरीप हंगामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच सन 2022-23 च्या खरीप हंगामाच्या नियोजनावर चर्चा झाली. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माहिती पुस्तिकेचे व पोस्टरचे प्रकाशन पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.
श्री. शिंदे म्हणाले की, खेवारे येथे शाफ्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीला पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू केली. अशा तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जास्त क्षेत्र पाण्याखाली येते. त्यामुळे जिल्ह्यात आणखी 12 ठिकाणी अशा प्रकारची योजना सुरू राबवावी. जिल्हा वार्षिक नियोजनच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यात माती परीक्षणासाठी फिरते परीक्षण वाहनासाठीही जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी पालकमंत्र्यांसह आमदार निधीतूनही मदत मिळेल.
शेती किफायतशीर होण्यासाठी गट शेतीला प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच त्यांच्या मालासाठी विक्री व्यवस्थाही करण्यात यावी. विकेल ते पिकेल योजनेनुसार शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृषि विभागाने सहाय्य करावे. संत सावता माळी आठवडे बाजाराच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीसाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहसंकुलात जागा द्यावी. जेणेकरून नागरिकांनाही ताजी व स्वच्छ भाजी मिळेल. जिल्ह्यातील भेंडी उत्पादन वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
खरीप हंगाम 2022-23 चे नियोजन करताना शेतकऱ्याना जी बी-बियाणे व खते हवीत तीच बियाणे व खते मिळावीत, यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाच्या योजनांची पोचवायला हव्यात. ठाणे जिल्ह्यात अनेक तबेले आहेत. तेथील शेणखताचा वापर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
आमदार गणपत गायकवाड यांनी कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये योजनांचे फलक लावण्याची सूचना केली. कृषी विज्ञान केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात जांभूळ फळांची झाडे लावण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी यावेळी केली.
जिल्हा कृषी अधिक्षक मोहन वाघ यांनी यावेळी सन 2022-23 या वर्षाचे खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. सन 2021 मधील नैसर्गिक आपत्तीतील नुकसान ग्रस्तांना 1 कोटी 79 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षी 75 टक्के पिककर्ज वाटप झाले आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 13 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती श्री. वाघ यांनी यावेळी दिली.
असे आहे खरीप 2022-23 चे नियोजन
- जिल्ह्यातील सुमारे 77 हजार हेक्टर पडीक जमिनीवर पेरणीचे नियोजन
- त्यामध्ये भात शेतीचे 56 हजार हेक्टर
- नाचणीचे 7 हजार 81.65 हेक्टर
- तूरचे 10 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन
- बांधावरही तूर लागवडीवर भर
- तृणधान्ये,इतर डाळी, गळीत धान्ये व कडधान्यांची 4285.5 हेक्टर क्षेत्रावर पेरणी
- भात व नागली पिकाच्या उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न
- जमिनीची सुपिकता निर्देशांक वाढीसाठी विशेष मोहिम
०००