Home ताज्या बातम्या शेवाळवाडीपर्यंत मेट्रो धावणार

शेवाळवाडीपर्यंत मेट्रो धावणार

0

पुणे : यापूर्वी प्रस्तावित असलेला शिवाजीनगर ते फुरसुंगी असा मेट्रो मार्ग आणखी पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शिवाजीनगर ते शेवाळवाडीपर्यंत मेट्रो धावणार आहे. यासाठी दिल्ली मेट्रोकडून सुधारित अहवाल करून घेण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे शिवाजीनगर ते फुरसुंगीदरम्यान 16 किलो मीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणखी चार किलोमीटरने वाढणार आहे.

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान, शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. तसेच, प्राधिकरणानेही शहरभर मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हडपसर भागातही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागातून अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भाग तसेच हिंजवडीपर्यंत प्रवास करतात. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हडपसरपर्यंत मेट्रो नेणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे पीएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांचा आढावा बैठक घेतली. यात शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनपर्यंत दर्शविलेला मेट्रो मार्ग शेवाळवाडीपर्यंत वाढविण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

मार्गाचा अहवाल लवकरच तयार होणार
शिवाजीनगर न्यायालय- रेल्वे कॉलनी- कलेक्‍टर ऑफिस, एमजी रोड- फॅशन स्ट्रीट – मंमादेवी चौक – रेसकोर्स – काळूबाई चौक – वैदवाडी- हडपसर फाटा – हडपसर बस डेपो – ग्लाईडींग सेंटर- फुरसुंगी आयटी पार्क- सुलभ गार्डन असा मार्ग होता. तो आता सुलभ गार्डन येथून शेवाळवाडीपर्यंत नेण्यात येणार असून त्या मार्गाचा अहवाल लवकरच तयार करण्यात येणार आहे.

मेट्रो मार्गासाठी जागा उपलब्ध होणार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गासाठी आवश्‍यक 15 हजार चौरस मीटर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांनी पीएमआरडीएच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्‍त विक्रम कुमार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर आदींसह अधिकारी उपस्थित होते. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोहोचता येईल अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन करावे, अशा सूचना पवार यांनी या बैठकीत दिल्या.