शैक्षणिक क्षेत्रातील निस्पृह निरंतर ज्ञानसाधनेचा उत्तुंग हिमालय ! म्हणजे माझी शाळा माणगांव तालुक्यातील खरवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन माध्यामिक विद्यालय ! !

- Advertisement -

माणगांव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रणी असलेल्या नूतन माध्यामिक विद्यालय खरवली या शैक्षणिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने हा छोटासा लेख प्रपंच
वैश्विक पटलावर समग्र शैक्षणिक क्षेत्रात अवघ्या जगाला प्रेरणादायी ठरलेल्या भारतातील जगप्रसिद्ध प्राचीन नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, ओदांतपूरी उज्जैन आदी विश्व विद्यालयांची भूषणावह परंपरा आणि शैक्षणिक पार्श्वभूमी भारताला लाभली आहे. एकेकाळी या प्राचीन विश्वविद्यालयात अनेकविध शास्त्रांचे दर्जेदार निवासी स्वरूपातील विविध विषयांचे शिक्षण घेण्यासाठी जगभरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भारतातील या विश्व विद्यालयात येत असत. एवढी मोठी शैक्षणिक क्षेत्रात अलौकिक प्रगती भारताने त्या काळात केली होती.
प्राचीन काळापासून शैक्षणिक क्षेत्रात अधिराज्य गाजवून नेहमीच अग्रणी राहिलेल्या भारतातील अनेक राज्यात शैक्षणिक क्रांतीची मशाल अधिकाधिक प्रज्वलित होत गेली. तद्वत सन १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्या नंतर अनुक्रमे नागपूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ अशी पुढे सरकारी आणि खासगी विद्यापीठांची भलीमोठी श्रृंखलाच वाढत गेली.
राज्यातील या शैक्षणिक क्रांतीची वाटचाल पुढे ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात संचार करू लागली. या शैक्षणिक क्रांतीमुळे राष्ट्रासह राज्याचा झालेला सर्व क्षेत्रातील सर्वांगीण विकास या मधून प्रेरणा घेऊन माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागात खरवली विभागातील तत्कालीन तमाम शिक्षण प्रेमी व समाज धुरीणांनी खरवली विभागात स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थे मुळे खरवली विभाग पंचक्रोशीची शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने मान उंचावणार्या तथा खरवली विभागातील सर्व जनतेची अस्मिता , स्वाभिमान आणि आत्मसन्मान असलेल्या खरवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन माध्यामिक विद्यालय खरवली या शैक्षणिक संस्थेची पायाभरणी खरवली विभागातील शिक्षणावर प्रचंड निष्ठा असलेल्या अनेक समाज धुरीण, ज्ञानप्रिय तत्कालीन शिक्षण प्रेमी, दानशूर मंडळी एकत्र येऊन त्यांनी या खरवली विभागातील गोरगरीब शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी मोठ्या दूरदृष्टीने आणि उदात्त हेतूने सन २७ मे १९७० साली खरवली येथे खरवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन माध्यामिक विद्यालय खरवली या ज्ञान मंदिराची मोठ्या व्यापक दृष्टीकोनातून स्थापना केली. याच वर्षी या शैक्षणिक संस्थेला शासन मान्यता मिळाली. सदर विद्यालयाचे पहले मुख्याध्यापक होण्याचा मान श्री. अशोक नारायण नागावकर यांना मिळाला. या नंतर अनुक्रमे श्री. रामचंद्र हरी कांबळेकर सर, श्री. पुंडे सर, श्री. दत्तात्रय गेणू साळुंखे सर, श्री. पोपट बापू शिंदे सर, श्री. प्रदीप विठोबा खडतर सर आणि विद्यमान मुख्याध्यापक श्री. विष्णू महादेव साळुंखे सर यांना आजवर मिळाला आहे.
सदर शैक्षणिक संस्था रुपी इवल्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले असून सदर शाळेच्या इमारतीने आता जीर्ण कात टाकून बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगाला शोभेल असे स्वतः मध्ये परिवर्तन केले आहे. सदर शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी सेमी इंग्रजी माध्यम सुरू असून या विद्यालयाची प्रतीवर्षी नव्वद ते शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सदर विद्यालयात सद्या सोळा शिक्षक आणि चार शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषतः त्या काळात कोणत्याही प्रकारच्या भौतिक सोई सुविधा उपलब्ध नसताना प्रचंड मोठ्या उर्मीने आणि जिद्द व चिकाटीने खरवली विभागात शैक्षणिक क्रांतीची बीजे रोवून हे शैक्षणिक क्रांतीचे व्रत निःस्वार्थी वृत्तीने सुमारे पाच दशके निरंतर आणि अव्याहतपणे आजपर्यंत मनोभावे जोपासणार्या खरवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन माध्यामिक विद्यालय खरवली या ज्ञान मंदिराच्या तथा हायस्कूलच्या माध्यमातून समग्र शैक्षणिक ज्ञान ग्रहण करून आपल्या शैक्षणिक जीवनाचा पाया भक्कम करून सुसंस्कृत होवून या शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील उच्च शिक्षण घेवून सदर असंख्य विद्यार्थ्यांनी मागील चार दशकात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य, शैक्षणिक,कला, क्रीडा,राजकीय, न्याय, विधी, प्रसार माध्यमे, सुरक्षा तथा संरक्षण आणि शासकीय, प्रशासकीय क्षेत्रात उंच भरारी घेवून या सर्वच क्षेत्रातील महत्त्वाची प्रमुख पदे हासिल करून त्यांनी आपल्या कौटुंबिक उत्कर्षा बरोबर राष्ट्र हिताच्या व निर्माणाच्या कार्यात आपले मौलिक व अनमोल असे योगदान दिले आहे, देत आहेत आणि भविष्यातही देत राहणार यात माझ्या मनात यत्किंचित साशंकता नाही.
सदर नूतन माध्यामिक विद्यालय खरवली या विद्यालयात मी इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतला. पुढे आठवी ते दहाव्या इयत्ते पर्यंत मी याच विद्यालयात शिक्षण घेतले. त्या वेळेस या हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. द. गे. साळुंखे सर होते. तर पर्यवेक्षिका त्यांच्या पत्नी सौ. साळुंखे मॅडम होत्या हे उभय दाम्पत्य मोठे कडक शिस्तप्रिय होते. त्यामुळे शिष्टाचार, चारित्र्य, नैतिकता, स्वावलंबन, आदर इत्यादी मूल्यां बरोबर शाळेची वेळ, अभ्यास, गणवेश, वर्गपाठ, गृहपाठ, पाठांतर, उपस्थिती आणि शालेय शिस्त इत्यादी बाबतीतींचे उल्लंघन वा हयगय केलेली त्यांना बिल्कुल आवडत नसे त्यामुळे हयगय करणार्या विद्यार्थ्यांना ते कठोर शिक्षा करत असत. या करीता त्या वेळी टारगट विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी आमच्या शाळेत वेताच्या लवचिक घुंगरू लावलेल्या काठ्या होत्या. ( उदाहरणार्थ पोलीसांच्या हातातील वेताची काठी ) या काठीचा शिक्षा रूपी महाप्रसाद एकदा घेतलेला विद्यार्थी पुन्हा कधीही ती चूक करत नसे. सदर घुंगूर काठीची शालेय शिस्ती बाबतची दहशत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला लष्करातील सद्याच्या अत्याधुनिक एके फोर्टी सेव्हन आणि मशीनगन पेक्षा कैक पटीने जास्त वाटत होती. त्यामुळे त्या वेळी या हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची स्वयंशिस्त निर्माण झाली होती.
सदर नूतन माध्यामिक विद्यालय खरवली हायस्कूलची त्या वेळची जुनी इमारत दोन पाखी आणि एखाद्या रेल्वे गाडी प्रमाणे लांब लचक आणि कौलारू होती. शाळेच्या समोर प्रशस्त असे क्रीडांगण आणि त्याच्या लगत पुष्पवाटिका, प्रशस्त वर्ग खोल्या त्या मध्ये बेंच, सुसज्ज अशी प्रयोगशाळा, भव्य ग्रंथालय वगैरे सुविधा आमच्या वेळी उपलब्ध होत्या. मात्र माझे गाव या खरवली विभाग पंचक्रोशीतील शेवटचे गांव बोरघर हे असल्याने मला बोरघर ते खरवली हे तीन किलोमीटर अंतर आम्ही सर्व विद्यार्थी पायपीट करून शाळेत येत होतो. त्या वेळी बोरघर ते खरवली हा रस्ता प्रचंड धुळीचा आणि मोठमोठ्या दगड गोट्यांचा बनलेला होता. त्यामुळे या धुरळा युक्त रस्त्याने अनवाणी पायाने दगडगोटे आणि तप्त धुरळा तुडवत आम्हाला नेहमी शाळेत यावे लागत असे. त्यामुळे चालत येताना आमचे कपडे नेहमी धुळीने खराब होत असत.
आमच्या शाळेचे तथा सदर हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा हेडमास्तर आदरणीय साळुंखे सर त्या वेळी आम्हाला इंग्रजी, बीजगणित आणि संस्कृत विषय शिकवत असत. तर आदरणीय साळुंखे मॅडम आम्हाला मराठी आणि संस्कृत शिकवत असत. यांच्या व्यतिरिक्त इयत्ता आठवी ते दहावी या तीन वर्षांत आम्हाला या विषयांसह इतर विषय शिकविण्यासाठी श्री. पी. व्ही. खडतर सर, सी. डी. मोरे सर, श्री. व्ही. एम. साळुंखे सर, श्री. गडगे सर, श्री. कुलकर्णी सर, श्री. माने सर, शिंदे सर, शिंदे मॅडम, श्री. कोरे सर, श्री. गुळवणी सर, श्री. हेगडकर सर, श्री. ढाकणे सर, श्री. चिनके सर आणि श्री. गांधी सर लाभले. त्याच बरोबर सदर हायस्कूल मधील श्री. वडेकर सर, श्री. जंगम सर, सौ. खराडे मॅडम, सौ. करकरे मॅडम यांच्या सह आमच्या शाळेचा शिक्षकेतर वर्ग उदाहरणार्थ लेखनिक खडतर सर, जुमारे सर, शिपाई उदय जाधव, भोनकर, लहाने आणि उकीर्डे यांचे माझ्या शैक्षणिक जीवनात मला मौलिक मार्गदर्शन लाभले. वरील सर्व शिक्षक आपल्या शिक्षकी पेशाशी एकनिष्ठ व एकरूप होऊन धेय्यप्रेरीत झालेले असल्याने ते नेहमीच अध्यापन कार्यात उत्साही असत. त्यांना सर्व शालेय विद्यार्थी आणि शाळे विषयी त्यांच्या मनात प्रचंड आस्था आणि आत्मियता ठासून भरलेली होती. त्यामुळे ते नेहमी आमच्या मनात अध्ययन वा ज्ञानार्जना संबंधी आत्मविश्वास निर्माण करत त्यामुळे आमच्यात शिक्षणा विषयी अभिरुची आणि आसक्ती निर्माण होत राहिली त्यामुळेच आज आम्ही सुसंस्कृत झालो आणि जे काही घडलो आहोत या मध्ये या सर्वच गुणीजनांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे जीवनातील अखेरच्या श्वासापर्यंत कायम ऋणी आहोत आणि राहणार.
लेखक – पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड मु. बोरघर तालुका माणगांव जिल्हा रायगड भ्रमणध्वनी ८००७२५००१२/ ९८२२५८०२३२ ( माजी विद्यार्थी नूतन माध्यामिक विद्यालय खरवली )

- Advertisement -