धुळे, दिनांक 25 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी व विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी पालक, शिक्षक, तसेच समाजसेवी संस्थांचे योगदान आवश्यक आहे. असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुवर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षिरसागर आदी उपस्थित होते.
शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतानाच शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टिफिशियल इंटिलीजन्स) सारख्या माध्यमांचा शालेय शिक्षणात उपयोग करावा. प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले पाहिजे. पहिलीच्या विद्यार्थ्यास किमान बाराखडी व अंक गणिताची ओळख असणे, दुसरीच्या विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येणे आवश्यक तर तिसरीच्या विद्यार्थ्यांना पाढे यावे अशा सोप्या पद्धतीने शिकविणे आवश्यक आहे. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करण्यात येईल. शाळेतील शिक्षण ग्रामसमितीला सोबत घेऊन काम करावे. शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यासोबत इतर योजनांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास करावा. मनरेगा योजनेतून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संरक्षण भितींचे काम करावीत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच शाळेतील स्वच्छता गृहाची साफसफाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावी. 14 वा 15 व्या वित्त आयोग, क्रीडा विभाग, स्थानिक स्वराज्य निधी, आमदार, खासदार निधी तसेच अनेक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सीएसआर फंडातून शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्यात. शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. शाळा सुटण्याच्या वेळी टवाळखोर विद्यार्थ्यांवर पोलीस विभागाने दामिनी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यातील दोन शाळांना पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन करुन ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह सुविधा, तसेच विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सुपर 50 सारखे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावेत. आगामी काळात किमान आठवीपासून आठ झोनमध्ये विविध क्षेत्रातील शाळा सुरू करणार आहे. यात कला, क्रीडा, इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, विज्ञान, डिजिटल शाळा सुरु करण्यात येणार आहे. तसेच राज्यात 200 पेक्षा जास्त पटाच्या शाळेच्या एक गट स्मार्ट शाळा म्हणून सुरु करणार, शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जलदगतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शाळाबाह्य कामे कमी करण्याचा आगामी काळात प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करुन त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे यांनी शिक्षण विभागामार्फत राबवावयाचा 10 सुत्री कार्यक्रम तसेच शिक्षकांच्या अडचणी सोडविणेबाबत, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण कॉपीमुक्त अभियान याबाबत माहिती दिली.
प्रांरभी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर, डाएटच्या प्राचार्या मंजुषा क्षिरसागर यांनी पीपीटीद्वारे जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या बैठकीस शिक्षण विभागाचे सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000000