Home ताज्या बातम्या श्रीपांडुरंग पालखी सोहळा आज आळंदीत

श्रीपांडुरंग पालखी सोहळा आज आळंदीत

0

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या ७२४व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून श्रीपांडुरंगाच्या पादुका पालखी सोहळ्याअंतर्गत ‘श्रीं’ची पादुका पालखी दिंडी हरिनाम गजरात आळंदीत बुधवारी (दि. २०) प्रवेश होणार आहेत. दरम्यान, ‘श्रीं’च्या कार्तिकी यात्रेची सुरुवात श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या पायरीपूजनाने आळंदीत होईल. यानिमित्त आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यावरून भाविकांच्या दिंड्या-दिंड्यांतून हरिनाम गजरात सुरू असलेला प्रवास अंतिम टप्प्यात आला आहे. सोहळ्यासाठी आळंदीत भाविक वारकरी दाखल होत आहेत. दरम्यान सकाळी दिवे घाटात झालेल्या अपघातात सोपान महाराज नामदास व एका वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आळंदीवर शोककळा पसरली आहे.
आळंदी कार्तिकी यात्रेत पंढरपूरहून श्री पांडुरंगाच्या पादुका आणण्यास गेल्या ६ वर्षांपासून विठूनामाच्या जयघोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यासाठी श्री पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला श्री पांडुरंगाच्या पादुका आळंदीला नेण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष श्री पांडुरंग माऊलींचे संजीवन समाधी दिन प्रसंगी सोहळ्यास आळंदीत उपस्थित असतात, अशी भावना व वारकºयांची श्रद्धा आहे. वासकरमहाराज यांच्या मागणीप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यासाठी मान्यता दिली. त्यानंतर श्री पांडुरंगरायाच्या पादुका पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर ते आळंदी या मार्गावर पायी वारीस सुरुवात झाली. श्री पांडुरंगरायाच्या पादुका पालखी सोहळ्यात दर वर्षी भाविकांची संख्या व सोहळ्यात वाढ होत आहे.  
या वर्षी रथाच्या पुढे १५, तर रथामागे १० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण व कर्नाटकातील वारकरी श्री पांडुरंगरायाच्या पादुका पालखी सोहळा पायी वारीत सहभागी झाले आहेत. यात सुमारे १६ हजारांवर वारकरी भाविक प्रवास करीत असल्याचे सोहळाप्रमुख गोपालमहाराज देशमुख यांनी सांगितले.
पंढरपूर येथून कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा हरिनाम गजरात मार्गस्थ झाला. हा सोहळा आळंदीत (दि. २०) अष्टमीला अलंकापुरीनगरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासह अनेक ठिकाणी श्रींचे पादुकांचे दर्शन व स्वागत होत आहे.
………..
आळंदीत कार्तिकी वारीला बुधवार (दि. २०)पासून मौली मंदिरात विविध धार्मिक प्रथांचे पालन करीत सुरुवात होणार असल्याचे पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी संगितले. श्रीगुरू हैबतरावबाबांचे पायरीपूजन सकाळी ९ वाजता होत असून, त्या प्रसंगी प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील आदी मान्यवरांसह वारकरी संप्रदायातील कीर्तनकार उपस्थित रहाणार आहेत. आळंदी यात्रेदरम्यान कार्तिकीत भागवत एकादशीला फार महत्त्व आहे. या दिवशी भाविक, वारकरी एकादशी साजरी करतात. 
४या वर्षीची भागवत एकादशी आळंदी यात्रेत शनिवारी (दि. २३) साजरी होत आहे. भागवत एकादशीनिमित्त पहाटपूजेत अभिषेक (मध्यरात्री) होणार आहे. नगरप्रदक्षिणेस दुपारी एकच्या दरम्यान सुरुवात होईल. जागर कार्यक्रम रात्री १२ ते पहाटे २ होणार आहे. रविवारी (दि. २४) श्रींना अभिषेक रात्री १२ ते पहाटे २, शासकीय पूजा पहाटे ३.३० वाजता होणार आहे. पालखी नगरप्रदक्षिणेस सुरुवात दुपारी ४ वाजता, रथोत्सवाची सांगता सायंकाळी ७, प्रसादवाटप रात्री ११ ते १२, सोमवारी (दि. २५) मुख्य सोहळा यात ‘श्रीं’चा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होईल. यानिमित्ताने  संत नामदेवांच्या वंशजांकडून मंदिरात पूजा (सकाळी ७ ते ९), नामदासमहाराज यांच्या वतीने परंपरेने मानाचे कीर्तन, नामदासमहाराजांचे कीर्तन (सकाळी १० ते दु. १२), घंटानाद, पुष्पवृष्टी (दुपारी १२) होईल.
……..
पुणे : कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) दि. २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीत १२४ जादा बस सोडणार आहेत.  
यात्रेनिमित्त भाविक मोठ्या संख्येने आळंदी येथे जातात. त्यांच्या सोयीसाठी पीएमपीकडून दर वर्षी जादा बस सोडण्यात येतात. त्यानुसार यंदाही बसचे नियोजन केले असून, एकूण २११ बस सलग सात दिवस या मार्गावर धावणार आहेत. तसेच दि. २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रात्री १२नंतरही गरजेनुसार बस सोडण्यात येणार आहेत. रात्री १० नंतर जादा बससाठी सध्याच्या तिकीटदरापेक्षा ५ रुपये जादा तिकीट आकारणी करण्यात येईल. 
….
अन्य मार्गांच्या फेºया रद्द
४स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी व रहाटणी या ठिकाणांहून जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्त आळंदी आवारातील सध्याचे बस स्थानक स्थलांतरित करून ते काटेवस्ती येथून संचालित करण्यात आले आहे. दरम्यान, यात्रेनिमित्त जादा बस सोडण्यासाठी अन्य मार्गांवरील काही बसफेºया रद्द कराव्या लागणार आहेत.